पुणे

नववर्ष स्वागताला शहरवासीय निघाले पर्यटनाला

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक सज्ज झाले असून, पर्यटनाला विशेष पसंती देत काही नागरिकांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच पर्यटनस्थळांची बुकिंग केली आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी पर्यटनस्थळे गाठण्यास पसंती दिली आहे. कुटुंबीयांसह शहराबाहेरच नव वर्षाची सुरुवात करणार असून, यामध्ये कोकण आणि महाबळेश्वर परिसरातील विविध ठिकाणांना विशेष दिली आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यातील तसेच राज्याबाहेरील पर्यटन ठिकाणे नागरिकांनी बुक केली आहेत. याकाळात नागरिक पर्यटनाला विशेष पसंती दर्शवित असल्याने तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विमान, रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्स आदींच्या दरात वाढ झाली आहे. परंतु पर्यटनप्रेमी असलेल्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच नियोजन करून आपले नववर्ष स्वागत पर्यटनस्थळाचे बुकिंग करून ठेवले आहे.

दरात 15 ते 20 टक्के वाढ

विमानसेवेद्वारे पर्यटनस्थळी जाणार्‍यांच्या तिकीटदरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहेत. इंधन आणि करांच्या वाढत्या किंमतीमुळे ही वाढ झाली असली तरी पर्यटकांच्या वाढत्या संख्येचादेखील परिणाम झाला आहे.समुद्र किनारी नववर्षाचे स्वागत राज्यातील कोकाणातील दापोली, तारकर्ली, सिंधुदूर्ग, मालवण आदी समुद्रकिनारे या ठिकाणांना पर्यटक विशेष भेटी देत आहेत. या ठिकाणीच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे.

विमानाचे 5 हजारांचे तिकीट 18 ते 20 हजारांना

राजस्थान, केरळ गोवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. गर्दीमुळे काही विमान वाहतूक करणार्‍या कंपन्यांनी 5 हजारांचे तिकीटदर 18 ते 20 हजारांपर्यंत वाढविले आहे. राजस्थान येथील तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

20 डिसेंबर ते 3 जानेवारीसाठी बुकिंग

20 डिसेंबर ते 3 जानेवारी या दिवसांत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पर्यटनासाठी हॉटेल्सची बुकिंग केली आहे. त्यामुळे यादिवसांत मोठ्या प्रमाणात बुकिंग झाल्या आहेत.

राज्यातील या स्थळांना विशेष भेटी

महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला पर्यटकांची विशेष पसंती आहे. त्यासोबतच वर्षभर कोकणाला भेटी देणार्‍यांची संख्या अधिक असल्याने या न्यू ईअरच्या काळातही महाबळेश्वरसाठी अधिक पसंती असल्याची माहिती टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.
राज्याबाहेरील ही स्थळे विशेष आकर्षणाची
नव्या वर्षासाठी बरेच नागरिक राज्यासह राज्याबाहेरदेखील करमणूक करण्यासाठी जात आहेत. यामध्ये केरळ, राजस्थान व गोवा येथील विविध पर्यटनस्थळांना पर्यटक भेटी देत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT