पुणे: सासरी होणार्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. प्रतीक्षा खळदकर (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद, सासू सविता, दीर चेतन, नणंद वैभवी (सर्व रा. धनकवडी), तसेच निर्मला आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रतीक्षाची आई उषा हरपळे (वय 40, रा. हरपळे आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पती आनंद याला अटक केली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचा 11 जून 2020 रोजी अभिषेक खळदकर याच्याशी विवाह झाला होता. हुंड्यात प्रतीक्षाला सात तोळे सोन्याचे दागिने, तसेच विवाहाचा खर्च हरपळे कुटुंबीयांनी केला होता. सासरी नांदत असताना प्रतीक्षाला वेळोवेळी टोमणे मारुन तिचा छळ करण्यात आला. छळामुळे ती माहेरी निघून आली.
6 एप्रिल रोजी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीक्षाचा छळ केल्याने तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिची आई उषा हरपळे यांनी नुकतीच दिली. त्यानंतर, पोलिसांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.