नारायणगाव: केंद्रातील कृषिमंत्री मामा व राज्यातील कृषिमंत्री मी पण मामा, असे दोन्ही मामा मिळून शेतकर्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करू तसेच शेतकर्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पिंपळवंडी शाखेचे नवीन जागी स्थलांतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अनेकदा शेतकरी म्हणतात, शेती व्यवसाय परवडत नाही. (Latest Pune News)
परंतु, नियोजनबद्ध शेती केली तर शेतामधून चार पैसे मिळतात. निसर्गाचा लहरीपणा शेतकर्याला अडचणीत आणतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, भविष्यकाळात शेतकर्याला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रयत्न राहील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या, याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, असे भरणे यांनी सांगितले.
शेतकर्यांना कर्जमाफी कधी मिळणार? याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार, शिंदे याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतील, असे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलण्याचे टाळले तसेच शेतकर्यांना खते घेताना इतर खतांची सक्ती केली जाते. यावर भरणे यांनी माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले.
विरोधकांच्या आरोपांत तथ्य नाही
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, विरोधक आपला पराभव झाकण्यासाठी ईव्हीएम मशिनला दोष देत आहेत. सरकारला बदनाम करीत आहेत. परंतु, त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. तसे झाले असते तर आमच्या पक्षाचे आमदार पराभूत झाले असते का? त्यामुळे त्यात अजिबात तथ्य नाही. शरद पवार हेसुद्धा या विषयावर बोलतात. परंतु, याबाबत मी अधिक बोलणे उचित नाही. त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य उत्तर देतील.