भोर: निरा देवघर व भाटघर धरणातील पाणीसाठ्यात रिमझिम पावसामुळे किंचित वाढ झालेली आहे. निरा देवघर धरणांत शनिवारी (दि.9) सकाळी 91.74, तर भाटघर धरणात 97.79 टक्के पाणीसाठा झाला आहे.
जून महिन्यातील दोन तारखेला भाटघर धरणात एकूण मृतसाठा 7.15, तर निरा देवघर धरणात 9.38 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, भोर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरण परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांत शनिवारी किंचित वाढ झालेली आहे. (Latest Pune News)
गेल्यावर्षी 9 ऑगस्टला भाटघर 100 टक्के तर निरा देवघर धरणात 91.78 टक्के भरले होते. परंतु यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व मोठा पाऊस झाला. तसेच सध्या पडत असलेल्या पावसाने गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे यंदा भाटघर व निरा देवघर, वीर, गुंजवणी धरणात 72.52 टक्क्यांहून जास्तीच्या पाण्याची वाढ झाली आहे. निरा देवघर, भाटघर धरणाचे दोन्ही विसर्ग बंद आहेत.
तसेच मागील वर्षांच्या तुलनेने यंदा वीर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने कपात झाली. धरणात यंदा पहिल्यांदाच 91.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, आता तालुक्यात आठ दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे ओढे - नाले, भात शेतीतून पाणीपातळीत घट होत आहे. तसेच पाण्याअभावी डोंगर भागातील भातशेती अडचणीत आल्याचे शेतकर्यांनी सांगितले आहे.