विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत टिळक रस्त्यावर वाहतूकबंदी Pudhari
पुणे

Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत टिळक रस्त्यावर वाहतूकबंदी

मध्येच शिरणार्‍या मंडळांना रोखणार

पुढारी वृत्तसेवा

Tilak Road traffic ban

बिबवेवाडी/सहकारनगर: टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पूरम चौकात डीसीपी, एसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस नियंत्रण कक्षाची उभारणी, सकाळी 11 पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूकबंदी आणि दोन मंडळांमध्ये पडणारे अनेक तासांच्या अंतराला आळा घालणार आदी महत्त्वपूर्ण घोषणा शहराच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत आज केल्या.

टिळक रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढणार्‍या गणेशोत्सव मंडळांच्या वतीने सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहात आयोजित बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्व मंडळांनी शिस्त पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले. (Latest Pune News)

या वेळी बोलताना हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर म्हणाले की, आम्ही सकाळी 11 वाजताच स्वारगेट येथून मिरवणुकीला सुरुवात करतो, परंतु मध्येच शिरणार्‍या मंडळांमुळे मिरवणुकीला विलंब होत जातो. माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी मार्केटयार्ड, अप्पर, बिबवेवाडी, गुलटेकडी, महर्षीनगर, प्रेमनगर इत्यादी ठिकाणच्या मिरवणुकीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती या वेळी दिली.

बंदोबस्तासाठी पुण्याबाहेरून येणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना मिरवणुकीत कसा बंदोबस्त केला पाहिजे, याबाबत प्रशिक्षण द्यावे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व विघ्नहर्ता न्यासाचे सदस्य डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केली. मिरवणुकीत सहभागी होणार्‍या ट्रॅक्टर व ट्रकच्या चालकांवरही पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असेही ते म्हणाले.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सक्षम व चांगल्या बंदोबस्त लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. दिलेल्या परवान्यानुसारच विसर्जन मिरवणूक काढून त्या वेळेत संपविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या वेळी बोलताना केले.

लाऊड स्पिकरचा वापर करताना मंडळांनी आवाजाच्या पातळीबाबतच्या आचारसंहितेचे पालन करावे, अशी अपेक्षा सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याचीही मंडळांनी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

टिळक रोड परिसरात असलेले परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते हे अनुभवी असून ते चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, विशेष शाखेचे उपायुक्त संजय पाटील, ग्राहक पेठचे प्रमुख सूर्यकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला, सुधीर ढमाले आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीबाबतचे नवे निर्णय

  • टिळक रस्त्यावर पूरम चौकात (अभिनव महाविद्यालय चौक) पोलिस नियंत्रण कक्ष उभारणार

  • टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी डीसीपी व एसीपी दर्जाचेअधिकारी नेमणार

  • विसर्जनाच्या दिवशी सकाळी 11 पासून मिरवणूक संपेपर्यंत टिळक रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवणार

  • मिरवणुकीत वेगाने पुढे जाऊ इच्छिणार्‍या मंडळांना वाट करून देणार... त्यासाठी पुढील मंडळांना प्रसंगी रस्त्याच्या कडील मोकळ्या जागेत वा चौकात थांबवून ठेवणार

  • वडारवाडी, गोखलेनगर परिसरातून टिळक रस्त्यावर येणार्‍या मंडळांना पर्यायीमार्ग सुचविला जाणार

  • मिरवणूक मार्गात अडथळे येऊ नयेत यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम बॅरिकेटस् लावणार

  • परतीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेली वाहने व दुचाक्यांचे अडथळे दूर करणार. परतीच्या मार्गावर अशी वाहने उभी करण्यास बंदी घालणार. त्यामुळे मिरवणूक संपल्यानंतर मंडळे विनाविलंब परतू शकतील.

  • मद्यविक्री बंदीबाबत पूर्ण खबरदारी घेणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT