पुणे: अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळणार्या 123 ठगांची कुंडली खंगाळण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यांत त्यांनी देशात अशा प्रकारचे कोठे-कोठे गुन्हे केले आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. गुन्हे शाखेची सहा पथके या गुन्ह्याचा तपास करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. मंगळवारी स्वतः आयुक्तांनी या गुन्ह्यातील तपासाचा आढावा देखील घेतला. (pune news Update)
या प्रकरणी, गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह तिघे फरार आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यांतील आहेत. ’तुमच्या खात्यातून ड्रग्जचे व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, अशी भीती घालून त्यातून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते.
दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती आंतराष्ट्रीय पातळीपर्यंत असल्यामुळे तपासासाठी सहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला कामाची विभागणी करून देण्यात आली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची तीस-तीसच्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांचे पुर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात आहे. तसेच त्यांचे डोजिअर भरून माहिती अद्यावत करण्यात येते आहे. पुढे ही माहिती सायबर गुन्हेगारी संदर्भात राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या यंत्रणांना दिली जाणार आहे. त्यांनी जर इतर राज्यांत असे गुन्हे केले असतील, त्या गुन्ह्यात आरोपींना बाहेरच्या राज्यांतील पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.
आरोपी या कॉल सेंटरमधून मागील सहा महिन्यात किती अमेरिकन नागरिकांना कॉल करण्यात आले हे सद्या पोलिस पडताळून पाहत आहेत. त्यांना दररोज एक लाख अमेरीकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. याबाबतची माहिती गोळा करून ‘एनसीआरबी’कडे पाठवून देण्यात येणार आहे. याच बरोबर हे आरोपी फसवणूक करण्यासाठी टार्गेट कसे ठरवायचे, त्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती, याचासुद्धा अभ्यास पोलिस करत आहेत. आरोपींनी देश-विदेशातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक केलेले पैसे बिटकॉईन आणि हवालाच्या माध्यमातून भारतात आणत होते. त्यासाठी त्यांनी कोणत्या बँक खात्याचा वापर केला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलेले कॉल सेंटरमधील कर्मचारी विविध राज्यांतील आहेत. ते मागील सहा महिन्यांत कोठे होते. अशा विविध बाजूंनी पोलिस तपास करीत आहेत.