Three Leopards Spotted in Ranjani Village
पारगाव: आंबेगाव तालुक्यातील रांजणी परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वळती फाटा परिसरात एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी हादरले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सोमवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास किरण सहादू घायतडके यांना वळती रस्त्यावरील आषाढ हॉटेलच्या मागे तिन्ही बिबट्यांचे एकत्र दर्शन झाले. नंतर रात्री अकराच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी गेल्यावर शेतातील ओट्यावर एक बिबट्या निवांत बसलेला दिसला. (Latest Pune News)
घायतडके यांनी तत्काळ मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ टिपले. रांजणी परिसरात वारंवार बिबट्यांच्या हालचाली सुरू असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. ‘वन विभागाने तातडीने पिंजरे बसवून बिबट्यांचा बंदोबस्त करावा,’ अशी मागणी सहादू घायतडके, संदीप घायतडके, किरण घायतडके आदी शेतकऱ्यांनी केली आहे.