

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तब्बल 125 कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. परंतु, हा निधी आपल्यामुळेच आला आहे, यासाठी तालुक्याचे आजी-माजी आमदार यांच्यामध्ये जोरदार सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे.
तालुक्यातील माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सातत्याने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच हा निधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले. (Latest Pune News)
दुसरीकडे आमदार म्हणून रस्त्यांची झालेली दूरवस्था सुधारण्यासाठी विधानभवनात आवाज उठवला, पीएमआरडीएचे प्रमुख, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त यांच्याकडे नियमित पाठपुरावा केल्यानेच हा निधी प्राप्त झाल्याचा दावा विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेच्या बाजूने निकाल लागत असताना खेड तालुक्यात मात्र सत्तेच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य लोकांनी शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांना कौल दिला. त्यानंतर तालुक्यात आजी-माजी आमदारांमध्ये विविध विकासकामांवरून शीतयुद्ध सुरू आहे.
मंत्रीपदाची संधी असताना हा पराभव झाल्याची सल दिलीप मोहिते-पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर सर्वसामान्य लोकांनी आपल्याला निवडून दिल्याने तालुक्यातील जनता आपल्या पाठीशी असल्याचे आमदार काळे नेहमी सांगतात.
या निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी दोन्ही आजी-माजींमध्ये खटके उडताना दिसत आहे. राज्यात महायुतीतीची सत्ता असल्याने पदावर नसताना माजी आमदार मोहिते यांचा तालुक्यातील दबदबा कायम आहे. परंतु, बाबाजी काळे यांना जिल्हा परिषद प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत नसतानाही त्यांना प्रशासकीय, पक्षीय पातळीवर पाठपुरावा करत निधी मिळविण्यात यश येत आहे.
दरम्यान, माजी आमदार मोहिते-पाटील यांनी आमदार काळे यांच्या निवडणुकीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. परिणामी, त्यांच्यातील अंतर्गत वाद अधिकच वाढले आहेत. याचेच पडसाद नुकताच तालुक्यासाठी पीएमआरडीएकडून मंजूर झालेल्या निधीच्या श्रेयवाद घेण्यासाठी दिसू लागल्याचे बोलले जाते.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियातून आपल्या नेत्याने तालुक्यासाठी निधी आणल्याने कौतुक केले आहे. दुसरीकडे या निधीच्या चढाओढीतून तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांची स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा नागरिकांना निर्माण झाली आहे.
शीतयुद्धाचा परिणाम कामावर नको
निकृष्ट दर्जाचे काम व अति पावसामुळे तालुक्यातील बहुतेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पीएमआरडीएच्या या निधीमुळे किमान काही रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा आहे. परंतु, आजी-माजी आमदार यांच्यातील श्रेयवादाच्या शीतयुद्धाचा परिणाम रस्त्यांच्या कामावर होऊ नये, अशी अपेक्षादेखील नागरिक व्यक्त करत आहेत.