भामा आसखेड: कोये (ता. खेड) गावाच्या उत्तरेला असलेल्या माळवाडी-कलवडे वस्तीच्या परिसरात तीन बिबट्यांच्या एकत्रित वावराने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. कोये गावाच्या परिसरात तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे.
घराच्या दरवाजाजवळ येऊन शेतकर्यांच्या पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्या करीत असल्याचे शेतकर्यांनी पहिल्याने त्यांना घराबाहेर पडणे नको झाले आहे. जनावरांना रानमाळावर चारायला सोडणे देखील मुश्किल झाले. गावातील शाळेत मुलांना पाठवावे की नाही याबाबत भीती निर्माण होऊन पालक चिंताग्रस्त झाले आहेत. (Latest Pune News)
माळवाडी कलवडे वस्ती ही गावच्या उत्तरेला एकटी असून या परिसरात तीन बिबटे एकत्रितपणे फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले. या परिसरातील काही पाळीव कुत्र्यांच्या फडशा बिबट्याने पाडला असून पशुधनावर देखील हल्ले झाले आहेत. यामुळे साहजिकच येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी शेतात जाईनात आणि जनावरे चारण्यासाठी देखील कुणीही वाहेर पडत नाही. त्यातच वीजेचा लपंडाव सातत्याने सुरु असल्याने अंधारात बाहेर जायला लोक घाबरत आहेत, अशी प्रचंड भीती बिबट्याने निर्माण केली.व न विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून मुक्तसंचार करीत असलेल्या बिबट्यांना पकडावे, अशी मागणी कोये गावचे माजी उपसरपंच सागर राळे आणि ग्रामस्थांनी केली आहे.