पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या असून त्यामध्ये सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी विश्रामबाग, विश्रांतवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार पेठेतील गुरुप्रसाद सोसायटी येथे राहणार्या संतोष धोंडू कदम (42,रा. शनिवार पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. 25 नोव्हेंबरला तक्रारदाराच्या घराचा दरवाजा बंद असताना अज्ञाताने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, 105 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपये असा 62 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत कळस परिसरातील आदमानी चाळ येथे अज्ञाताने घराचा मागील दरवाजा उघडून एक लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी हरिभाऊ नारायण बेलदरे (58, शिवाजी चौक, विश्रांतवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत राहत्या घरी हॉलमध्ये टेबलवर लक्ष्मीपूजनासाठी सोन्याचे दागिने ठेवून, वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल तोडून घरात प्रवेश करून 40 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 2 लाख 52 हजारांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी विक्रमराज आचार्य (37, रा. कुमार मेडोज सोसायटी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 14 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत घरफोडीचा प्रकार घडला.
हेही वाचा :