पुणे: शेअर ट्रेडिंग, स्टॉक आयपीओच्या बहाण्याने सायबर ठगांनी तिघांना 79 लाख 8 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर ठगांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
कोथरूड येथील एका 34 वर्षीय तरुणीची सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत 8 लाख 29 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी, कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
मानाजीनगर, नऱ्हे येथील एका 51 वर्षीय व्यक्तीलादेखील स्टॉक आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी 40 लाख 57 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी, संबंधित व्यक्तीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायबर चोरट्याने फिर्यादींना पैसा नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर स्टॉक व आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास लावून त्याद्वारे जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत फसवणूक केली.
तर तिसऱ्या घटनेत विमाननगर येथील 58 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून 30 लाख 22 हजार 470 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी, फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.