Three Die of Suffocation in Biogas Tank
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर तालुक्यातील बेलसर नजीक चोपण वस्ती परिसरातील एका मशरूम कंपनीत आज (रविवार) हृदयद्रावक घटना घडली. गोबर गॅस टाकीची साफसफाई करताना विषारी वायूचा फटका बसून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनी परिसरातील सुमारे ५ बाय ५ फूट आकाराच्या गोबर गॅस टाकीची साफसफाई सुरू होती. यावेळी एक कामगार टाकीत उतरला. मात्र टाकीमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे काही क्षणांतच त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार तत्काळ टाकीत उतरला, पण दुर्दैवाने त्याचाही श्वास गुदमरला.
दोघांना बाहेर काढण्यासाठी ठेकेदार स्वतः टाकीत उतरला. मात्र टाकीतील घातक वायूचा फटका त्यालाही बसला आणि काही क्षणांतच तिघेही बेशुद्ध पडले. मदतीसाठी धावलेल्या इतर कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेतील मृत तिघेही उत्तर प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.