पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन आर्थिक सेवा देणार्या इझी पे प्रा. लिमिटेड या कंपनीला त्यांच्याकडेच काम करणार्या तब्बल 65 एजंटांनी संगनमत करून तांत्रिक सुविधांचा गैरवापर करून तब्बल साडेतीन कोटींचा आर्थिक गंडा घातल्याला प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, या रॅकेटचा पर्दाफाश करत पुणे सायबर पोलिसांनी अंकितकुमार अशोक पांडे (वय 20,रा.नवादा बिहार) या एजंटला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
इझी पे या कंपनीचे येरवड्यात कार्यालय आहे. ही कंपनी भारतात ऑनलाइन पेमेंटची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देते. त्यासाठी कंपनीने भारतात नोंदणीकृत एजंटची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून कंपनीचे काम चालते. 11 ऑगस्ट 2022 पासून कंपनीच्या 65 एजंटांनी कंपनीच्या वेबपोर्टल अॅपद्वारे अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत दिलेले मोबाईल सोडून इतर मोबाईलचा वापर करून कंपनीच्या व्हीपीए खात्यातून इतर 44 बँक खात्यावर एजंटचे कमिशन सोडून 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रुपये ट्रान्सफर करून घेतले. कंपनीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गेल्यामुळे त्याची माहिती घेतली असता, एजंट लोकांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले.
पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले कर्मचारी राजकुमार जाबा, बाबासाहेब कराळे, नवनाथ जाधव, नीलेश लांडगे, बापू लोणकर, संदेश कर्णे, नितीन चांदणे, संतोष जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा :