सारोळा: स्वस्त सोनं मिळवून देतो, असे सांगून एकाला तब्बल साडेदहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत दि. 16 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा प्रकाश तुपे (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), राहुल चव्हाण (रा. वराडे, ता. कराड), आणि बुवा ठाकुर (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जयकुमार बाबासाहेब नरदेकर (वय 47, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा तुपे, राहुल चव्हाण आणि बुवा ठाकुर या तिघांनी संगनमताने नरदेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना 30 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने देतो, असे सांगितले. त्यांच्या आमिषाला नरदेकर बळी पडले. तिघांनी नरदेकर यांना निगडे गावात पैसे घेऊन बोलावले. तेथे रोख साडेदहा लाख रुपये या तिघांना दिले. मात्र, त्यानंतर त्या तिघांनी सोने न देता नरदेकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हवालदार नाना मदने हे पुढील तपास करीत आहेत.