Yavat Voilence Update: सहा दिवसांनंतर यवतमधील जनजीवन पूर्वपदावर

पोलिस ठाण्यात शांतता बैठक; सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
Yavat Voilence Update
सहा दिवसांनंतर यवतमधील जनजीवन पूर्वपदावरPudhari
Published on
Updated on

यवत/खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत (ता.दौंड) येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लागू केलेला जमाबंदीचा आदेश बुधवारी (दि. 6) रात्री 12 वाजेपासून मागे घेतल्यानंतर गुरुवार (दि. 7) पासून यवतचे जनजीवन पूर्वपदावर आले. गेले सहा दिवस बंद असलेली बाजारपेठ सकाळपासून सुरू झाली. यवत गावात दोन समाजांमध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी यवत पोलिस ठाण्यात शांतता बैठक झाली.

यवत येथे मागील शुक्रवारी (दि. 1) एका माथेफिरू तरुणाने सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सहा दिवस जमावबंदी लागू केली होती. जमावबंदी हटवल्यानंतर गुरुवारपासून यवतचे जनजीवन सुरळीत झाले. (Latest Pune News)

Yavat Voilence Update
Soybean Crop Damage: सोयाबीन पिकावर बुरशी व कीड रोगाचा प्रादुर्भाव; आंबेगाव तालुक्यातील चित्र

दोन समाजामध्ये जातीय सलोखा राहावा यासाठी यवत पोलिसांनी शांतता बैठक घेतली. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, यवतचे सरपंच समीर दोरगे, बाळासाहेब लाटकर, डॉ. श्याम कुलकर्णी, कुंडलिक खुटवड, सदानंद दोरगे, नानासाहेब दोरगे, शब्बीर सय्यद, कामरुद्दीन तांबोळी, अबरार शेख, बशीर शेख, पापाभाई तांबोळी, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर, उत्तम गायकवाड, विशाल भोसले, संदीप दोरगे, मुबारक शेख, पंडीत दोरगे, माजी सरपंच दशरथ खुटवड, अशोक दिवेकर यासह अनेक उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस या वेळी म्हणाले, यवत गावची संस्कृती चांगली असून, यापूर्वी अशी घटना घडली नाही. गावात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर त्यांच्यात सर्वधर्म समभाव होता. त्यांनी जाती-धर्माचा भेदभाव केला नाही.

महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आणि राज्य घटनेनुसार चालणारा हा देश आहे. आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. समाजामध्ये वावरताना काही मतभेद असतील तर ते सोडवले पाहिजेत. समतेचा गाभा टिकवला पाहिजे. कोणताही प्रश्न असतील तर ते सामोपचाराने सोडवले पाहिजेत. त्यासाठी पोलीस प्रशासन देखील आहे.

कायदा हातात घेऊन कृत्य करणे योग्य नसल्याचे दडस यांनी सांगितले. सरपंच समीर दोरगे यांनी घडलेली घटना यापुढे घडणार नाही, याची काळजी घेऊ असे सांगितले. डॉ. श्याम कुलकर्णी म्हणाले, घडलेली घटना निंदनीय आहे.

Yavat Voilence Update
Andharban and Kundalika Valley: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! अंधारबन, कुंडलिका व्हॅली उद्यापासून पर्यटकांसाठी खुली

यवत गावात सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न राहतील असे बाळासाहेब लाटकर म्हणाले, गावचे गावपण सुरक्षित राहण्यासाठी संचारबंदी सुरू होती. ती उठवण्यात आल्यामुळे पोलिस प्रशासनाचे आभार मानून पोलिस प्रशासनाला सहकार्य राहिल. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी उपस्थितांना राज्यघटनेची शपथ दिली.

कायदा हातात घेऊ नका : आ. राहुल कुल

मागील चार ते पाच दिवसांत घडणार्‍या सर्वच गोष्टींवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. शिवाय यवत गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व समाजाच्या नागरिकांबरोबर संवाद साधून प्रशासनाला योग्य त्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यवतकरांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news