Pune News: समाज माध्यमातील खात्यातून गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पत्रकार तसेच समाजसेवक म्हणून काम करणार्या एकाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपूर्वी शहरातील प्रसिद्ध मालकाला बिष्णोई टोळीच्या नावे धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत दादा घुले पाटील नावाच्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित खाते बनावट असल्याचे उघडकीस आले असून, याबाबत तांत्रिक तपास सुरू केला आहे. तक्रारदार सॅलिसबरी पार्क परिसरात राहायला आहेत. तक्रारदाराने फेसबुकवर खाते आहे. त्या खात्यावरून लॉरेन्स बिष्णोई टोळीबाबत एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टला सुमीत दादा घुले पाटील या नावाने बनावट खाते वापरत असलेल्या एकाने संदेश पाठविला.
त्याने भाईबद्दल काहीही बोलू नको म्हणत लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश शिंदे तपास करत आहेत.
दाऊद, बिष्णोईचे उद्दात्तीकरण करणार्या तिघांना बेड्या
देशाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचे फोटो असलेले स्टेटस ठेवणार्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाऊदखेरीज आरोपींनी स्टेटस स्टोअरीवर लॉरेन्स बिष्णोईचेही फोटो ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. भाग्यश्री संचेती (डागळे) यांनी युक्तिवाद केला की, आरोपींचा दाऊद इब्राहिम टोळीशी काही संबंध आहे का? याचा तपास करायचा आहे.
त्यांनी स्टोअरीवर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस कोठे बनविले, त्यांना स्टेटस ठेवण्यास कोणी प्रवृत्त केले, त्यासाठी कोणी चिथावणी दिली आहे का, याखेरीज यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आदी मुद्द्यांवर सखोल तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अॅड. संचेती यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत तिघांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.