वारकर्‍यांच्या सेवेसाठी सरसावले हजारो हात!  Pudhari
पुणे

Ashadi Wari 2025: वारकर्‍यांच्या सेवेसाठी सरसावले हजारो हात!

घोरपडी, रामटेकडी, वैदूवाडी परिसरात विविध उपक्रम; पालखी सोहळ्यामुळे वातावरण विठ्ठलमय

पुढारी वृत्तसेवा

मुंढवा: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामुळे रविवारी सकाळी घोरपडी, वानवडी, रामटेकडी व वैदूवाडी परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले होते. ‘पाऊले चालती पंढरीची वाट...’ असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले भक्तगण पंढरपूरच्या वाटेवर मार्गस्थ झाले. या वेळी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या वतीने वारकर्‍यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी 7.20 वाजता, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी 10.35 वाजता सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकात दाखल झाला. परिसरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनांकडून रस्त्याच्या दुतर्फा वारकर्‍यांसाठी मोफत अल्पोपहार, चहा, औषधोपचार, छत्री वाटप, असे उपक्रम राबविण्यात आले. (Latest Pune News)

घोरपडी, भीमनगर, बी. टी. कवडे रोड, शिंदे वस्ती, मगरपट्टा, मुंढवा आणि केशवनगर परिसरातील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने मुख्य रस्त्यापर्यंत येत होते आणि नंतर पालखीपर्यंत पायी जाऊन पादुकांचे दर्शन घेत होते.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन झाल्यावर नागरिकांच्या चेहर्‍यांवर आनंद झळकताना दिसत होता. बीआरटी मार्गामधील दुतर्फा वारकर्‍यांच्या गर्दीतून भक्तीभाव ओसंडून वाहत होता. मुंढवा पोलिस ठाणे, हडपसर वाहतूक विभाग आणि वानवडी पोलिसांना रस्त्याच्या दुतर्फा चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) सोलापूर रस्त्यावरिल क्रोम मॉल चौक येथे वारकर्‍यांसाठी उपवासाचे पदार्थ आणि पाण्याची बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, वसंत मोरे, उत्तम भुजबळ, अनिल परदेशी, आबा लोखंडे, महिंद्र रेड्डी, आदित्य भोरडे, आफण सय्यद, दिपक फडतरे, महिला आघाडीच्या उर्मिला कवडे, मनीषा मोडक, अश्विनी शिंदे, शुभांगी जाधव, तेजश्री कवडे आणि प्रभाग 21चे प्रमुख अतुल कवडे आदी या वेळी उपस्थित होते.

आम आदमी पार्टीच्या वतीने येथील वैदुवाडी चौकामध्ये वारकर्‍यांसाठी मोफत औषधोपचार उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टरांनी वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून गरजेनुसार त्यांना औषधे दिली. पक्षाचे शहर उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, दीपक गुप्ता, विनय काळे आदींचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

कोरेगाव पार्क येथील राजपूत डेअरीच्या वतीने वारकर्‍यांसाठी चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँगेसच्या माजी नगरसेविका सुरेखा कवडे व विशाल कवडे यांनी वारकर्‍यांसाठी तीन दिवस नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच रविवारी सकाळी क्रोम मॉल चौकात वारकर्‍यांना गुडदाणीचे वाटप करण्यात आले.

भीमनगर येथील सम्राट अशोक फांउडेशन व बाईट वर्क डेंटल इम्प्लांट यांच्या संयुक्त विद्यमाने वारकर्‍यांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. फांउडेशनचे संस्थापक कुमार चक्रे, श्रीधर जाधव, कैलास चक्रे, राजश्री म्हस्के, मनीष वाल्मीकी आदी या वेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT