पुणे

कोट्यवधी खर्चूनही पुण्यातील बससेवा अपुरीच…!

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : सर्वसामान्य प्रवाशांना उपयुक्त असलेल्या बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) या जलद बससेवेचा विस्तार गेल्या पाच वर्षांत म्हणावा तसा झाला नाही. राजकीय पक्षाची अनास्था आणि प्रशासकीय अधिकार्‍यांकडे दूरदृष्टीचा अभाव या कारणांमुळे पुणेकरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षित व सुरळीत झालीच नाही. पीएमपीएमएल संस्थेचा तोटा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या करातून रोज एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे.

देशात सर्वात प्रथम बीआरटीचा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) पुण्यात 2006 मध्ये सुरू झाला. त्यानंतर देशातील पंधरापेक्षा अधिक शहरात बीआरटी कार्यक्षमतेने सुरू झाली. पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही बीआरटी बससेवा चार मार्गांवरून कार्यक्षमतेने मार्गक्रमण करीत आहे. त्यांचा पाचवा मार्गही लवकरच सुरू होईल. हे लक्षात घेत पुण्यातील बीआरटी बससेवेचा गेल्या पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घ्यावा लागेल.

पथदर्शी प्रकल्पाची हेळसांड

पुण्यात बीआरटी प्रकल्पासाठी आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांहूनही अधिक खर्च झाला आहे. स्वारगेट ते कात्रजदरम्यानचा बीआरटी मार्ग देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. तेथे बीआरटीसाठी डेडीकेटेड मार्ग रस्त्याच्या मध्यभागी होता. दोन्ही बाजूला स्वतंत्र बसथांबे होते. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध प्रकल्प या मार्गावर हाती घेतले. त्यातच बीआरटी मार्ग व महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या आखणीलाही अनेक अडचणी आल्या. त्यामुळे हा बीआरटी मार्ग नव्याने पुन्हा करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या पाच वर्षांत हाती घेतला. तो पूर्ण करून तेथील बीआरटी बससेवा पुन्हा सुरू केली.

स्वारगेट व धनकवडी येथे दोन उड्डाणपूल, तर बिबवेवाडी आणि साईबाबा मंदिर येथे दोन पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात आल्याने, बीआरटी विस्कळीत झाली. सेवारस्त्याचा वापर वाहनतळासारखा होऊ लागला. मेट्रोचे काम स्वारगेटला सुरू झाले. बीआरटी मार्गातून अन्य वाहने जाऊ लागली. त्यामुळे या मार्गाची पुनर्रचना करण्याचे महापालिकेने ठरविले. 2017-18 मध्ये सुरू झालेले हे काम 2020-21 मध्ये पूर्ण झाले.

या नवीन कामासाठी 70 कोटी रुपये खर्च झाले. रस्त्याच्या मध्यभागी बसथांबा बांधून त्यातून दोन्ही बाजूंच्या गाड्यांमध्ये जाण्याची सुविधा दिली. असे दहा बसथांबे उभारले. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी रॅम्प बांधले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग उभारले. हा मार्ग सुमारे साडेसहा किलोमीटरचा आहे. कात्रजला स्वतंत्र बस टर्मिनल बांधले. त्यानंतर या मार्गावरून पुन्हा बीआरटी बससेवा गतवर्षी सुरू झाली.

बीआरटी मार्ग सुरळीत हवा

संगमवाडी ते विश्रांतवाडी या आठ किलोमीटर मार्गावर बीआरटी बससेवा 2015 च्या दरम्यान सुरू झाली होती. त्याचसोबत येरवडा ते आपल्या घरापर्यंतही बससेवा सुरू झाली होती. मात्र, महापालिकेने आता संगमवाडी येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी बीआरटी मार्गाचे लोखंडी रेलिंग काढून टाकले. तेथे पुन्हा रेलिंग बसविण्यास संगमवाडी ते विश्रांतवाडीदरम्यानच्या मार्गावर बीआरटी व्यवस्थित सुरू राहील. येरवडा ते वाघोलीदरम्यानच्या तेरा किलोमीटरच्या बीआरटी मार्गावर मेट्रोचे काम सुरू झाले. तेथील काही बसथांबे उखडले आहेत. काही ठिकाणी लोखंडी रेलिंग हटविले आहेत. त्यामुळे या मार्गावरील बीआरटी सेवा गेले दोन-तीन वर्षे विस्कळीत झाली आहे.

मेट्रोसोबत तेथील बीआरटी बससेवा सुरू राहिली, तर नागरिकांना चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा मिळू शकेल. त्याच पद्धतीने सांगवी-किवळे या साडेचौदा किलोमीटर मार्गावर अत्यंत चांगल्या पद्धतीने बीआरटी बससेवा सुरू आहे. ती औंधमार्गे शिवाजीनगरपर्यंत आणण्याची जुनी योजना गेल्या पाच वर्षांतही मार्गस्थ झालेली नाही. या मार्गावर आता नवीन मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू होत आहे. त्यासोबत बीआरटी बसथांब्याचे काम केल्यास, तेथून मेट्रो व बीआरटी बससेवा हे दोन्ही सुरू होतील.

पुणे-मुंबई रस्त्यावर बीआरटी गरजेची

पुणे-मुंबई रस्त्यावर दापोडीपासून निगडीपर्यंत बीआरटी बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, खडकीतील अरुंद रस्त्यामुळे पुणे महापालिका हद्दीतील बीआरटी रखडलेली आहे. तेथे दोन बसथांब्यांचे काम अर्धवट झाले आहे. संरक्षण विभागाकडून रस्ता रुंदीची जागा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी हॅरिस पुलापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत बीआरटी केली पाहिजे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांना जोडणा-या मार्गावर बीआरटी बससेवा, मेट्रो आणि लोकल रेल्वे या तिन्ही सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी स्वतंत्र मार्ग झाल्यास अन्य वाहनांनाही पुरेसा रस्ता मिळेल.

  • पीएमपी एकूण गाड्या : 1958
  • बीआरटी गाड्या : 665
  • बीआरटी एकूण मार्ग : 7
  • पुण्यातील बीआरटी बसमार्ग : 3
  • पुण्यातील बीआरटी मार्गाचे अंतर : 22 किमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT