पुणे: महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जातात. कंत्राटी पद्धतीने हे सुरक्षारक्षक नेमले जातात. यासाठी निविदा काढल्या जातात. मात्र, सुरक्षारक्षकांच्या भरतीत घोटाळा झाल्याने नव्याने निविदा काढण्यात आल्या. या वर्षी पालिकेने थेट तीन वर्षांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.
या निविदा प्रक्रियेतून ज्या कंपन्यावर 5 वर्षांत दंडात्मक कारवाई झालेली आहे, त्यांना निविदा प्रक्रियेतून अपात्र करण्यात आले आहे, तर सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी 22 कंपन्या इच्छुक असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
सुरक्षारक्षकांची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदेची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पालिकेत शुक्रवारी (दि. 25) बैठक पार पडली. सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी पालिकेकडे 22 कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. या कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी लोकेशन म्हणजेच ठिकाणांवर प्रामुख्याने चर्चा झाली तसेच या निविदा 5 ते 7 वर्षांसाठी काढण्यात याव्यात, पोलिसांकडून घेतल्या जाणार्या एनओसीबाबत व कामगार कायद्यानुसार असलेल्या नियमांवर बैठकीत चर्चा झाल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
निविदांची किमत 140 कोटींच्या घरात
कंत्राटी सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी पालिकेने तब्बल 139 कोटी 92 लाख रुपयांची निविदा काढली आहे. दरम्यान, या निविदा मिळविण्यासाठी राजकीय जोर लावला जात आहे. पालिकेला 650 कंत्राटी सुरक्षारक्षकांची कायम पदे मान्य आहेत. त्यापैकी केवळ 350 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे अपुर्या मनुष्यबळात सुरक्षा विभागाला काम करण्याची वेळ आली आहे.पालिकेची सावध भूमिका
यापूर्वी ज्या कंपन्यांनी सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले होते, त्यातील काही कंपन्यांनी कामगारांना वेतन उशिरा देणे तसेच पालिकेचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने पालिकेने आता सावध भूमिका घेतली आहे.