पुणे

देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन; सलग दुसर्‍या वर्षी जगात दुसर्‍या स्थानी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाकाळात हवामानाने दिलेली साथ व बियाणे, खतांचा योग्यवेळी झालेला पुरवठा, यामुळे यंदा देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. चालू वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत तांदळाचे उत्पादन 1 हजार 220 लाख टनांपर्यंत गेले आहे. त्यामुळे या वर्षीही भारत जगभरात तांदूळ उत्पादनात दुसर्‍या स्थानावर कायम आहे.

दोन वर्षांपासून कोविडची पहिली लाट, नंतर दुसरी आणि यावर्षीच्या शेवटी ओमिक्रॉनची लाट हे सगळे असतानाही देशात तांदळाचे उत्पादन चांगले आले आहे. सध्या जगभरात तांदळाचे उत्पादन 5 हजार 66 लाख टनांवर गेले आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा चीनचा आहे.
यंदा चीनमध्ये 1 हजार 500 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले आहे. 2020-21 मध्ये देशभरात 1 हजार 200 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात 20 लाख टनांची वाढ झाली आहे. प्रत्येक वर्षी जगासह देशातील तांदळाच्या उत्पादनात वाढ होऊन निर्यातीचे विक्रम प्रस्थापित होत असल्याची माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली.

सौदीमुळे बासमती तांदूळ महागला

सध्या सौदी अरबमधून तांदळाला चांगली मागणी आहे. एका सौदी कंपनीने नुकताच 40 हजार टन बासमती तांदळाचा सौदा साधारण 1020 डॉलर (यूएसडी) प्रतिटन या दराने आपल्याकडे केला आहे. त्यामुळे बासमती, 1121 बासमती, 1401 बासमती,1509 बासमती यांचे दर या महिन्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचबरोबर कोविडची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे जगभरातून बासमती तांदळाला मागणी चांगली आहे. परिणामी चालू महिन्यात बासमती तांदळाचे भाव वाढले आहेत. पारंपरिक बासमती तांदळाचे दर वाढून दहा हजार रुपये क्विंटल झाले आहेत, तर 1121 बासमती तांदळाचे दर वाढून 9000 ते 9500 रुपये क्विंटलपर्यंत गेलेे आहेत.

जगात व देशात कुठेही पिकाचे नुकसान न झाल्यामुळे देशात व जगात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्याच्या मागणीतही वाढ होत आहे. यामध्ये बासमतीला सर्वाधिक मागणी आहे. परिणामी भाव गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहेत.
                                                                            – राजेश शहा, तांदळाचे व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT