खडकवासला : मोसे, मुठा खोर्यात सोमवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत दिवसभरात 0.3 टीएमसी पाण्याची किंचित भर पडली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि. 27) सकाळपर्यंत धरणसाखळीत अर्धा टीएमसी पाण्याची भर पडण्याचा अंदाज खडकवासला जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.
पानशेत धरण परिसरात सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत गेल्या 11 तासांत सर्वाधिक 75 मिलिमीटर पाऊस पडला तसेच वरसगाव येथे 67, टेमघर येथे 23 व खडकवासला येथे फक्त 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी सहा वाजता धरणसाखळीत 5. 66 टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यात दिवसभरात 0.3 टीएमसी पाण्याची भर पडल्याने सायंकाळी पाच वाजता पाणीसाठा 5 .69 टीएमसी (19.53 टक्के) इतका झाला होता. गेल्या वर्षी 26 मे 2024 रोजी धरणसाखळीत जवळपास एवढाच म्हणजे 5 .81 टीएमसी पाणीसाठा होता.
खडकवासला-सिंहगड भागापेक्षा पानशेत खोर्यात पावसाचा जोर अधिक आहे. दापसरे, माणगाव, शिरकोली, तव, आडमाळ, धामण ओहोळ, दासवे भागात संततधार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मंदगतीने वाढ सुरू झाली आहे. खडकवासला धरणातून शेतीला पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. सध्या पुणे शहर व परिसराला पिण्यासाठी पुरेसे पाणी सोडले जात आहे, असे असले तरी पावसामुळे धरणात भर पडण्यास सुरुवात झाली आहे. पानशेत, वरसगाव खोर्यासह मुठा भागात रविवारी (दि. 25) सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. पानशेत धरणात 18.05 टक्के, वरसगावमध्ये 21 .04 आणि टेमघर धरणात सध्या 5.85 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीची एकूण साठवणक्षमता 29.15 टीएमसी आहे.