पुणे

काकडे, तावरे भेटीत वेगळे काही नाही : शरद पवार

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : काकडे व तावरे यांची मी भेट घेतली, सांत्वनपर भेटीसाठी मी गेलो होतो. या भेटीमध्ये वेगळे काही नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी दिली. बारामतीत गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्क लढविले जात होते. याबाबत पवार म्हणाले की, या भेटीने खळबळ उडाली वगैरे असे काही नाही. आम्ही दोघे एकत्र शिकलो, एकाच शाळेत होतो. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले. सुप्रिया यांच्या लग्नात पाहुण्यांची व्यवस्था चंद्रराव यांच्याकडे होती.

नंतरच्या काळात त्यांनी वेगळी राजकीय भूमिका स्वीकारली. तो त्यांचा अधिकार आहे. पण, व्यक्तिगत सलोखा आम्ही दोन्ही बाजूंनी कायम ठेवलेला आहे. त्यात राजकारण नाही. काकडे परिवाराची 55 वर्षांनंतर भेट घेतल्याचा मुद्दा पवार यांनी खोडून काढला. काकडे कुटुंबात दुःखद घटना घडल्याने मी सांत्वनपर भेटीसाठी गेलो होतो. त्या कुटुंबाचे प्रमुख बाबालाल काकडे यांच्या निधनानंतरही मी भेट घेतली होती. अशा सांत्वनपर भेटी एक सभ्यता व सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्या परिसरात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या एखाद्या कुटुंबात अशा घटना घडतात तेव्हा सांत्वनपर भेट घेतली जाते. बाकी त्यात काही नाही, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT