वाकड :
कोरोनाकाळात दोन वर्ष जलतरण तलाव बंद असल्यामुळे तेथील उपकरण बंद पडले होते. थेरगाव येथील खिवसरा पाटील जलतरण तलाव सध्या बंद असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ड्रेनेज वॉल बदलणे, बाथरूममध्ये नळ शॉवर बसवणे, दरवाजे-खिडक्या दुरूस्ती करणे, बॅलन्स टाकीचे झाकण बदलणे, तिकीट खिडकीजवळ रांगेसाठी लोखंडी रेलिंग करणे, नाल्यावर लोखंडी जाळी बसवणे, इमारतीला रंगंगोटी करणे, फिल्टरेशन प्लांट खोली दुरुस्ती कमी करणे आणि तलावाची खोली कमी करण्याचे काम सुरू आहेत.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे जलतरण तलाव बंद असल्यामुळे तलावाच्या स्टाईल्स निखळून पडल्या आहेत. सध्या त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, महापालिकेने चुकीच्या वेळी हे सर्व काम सुरू केल्यामुळे मिळणार्या महसुलावर महापालिकेवर पाणी सोडावे लागत आहे.
क्रीडा स्थापत्य विभाग वेगळा केल्यामुळे त्यांच्याकडे मागील वर्षी तरतूद नसल्यामुळे सर्व कामे बंद अवस्थेत होती. यावर्षी तरतूद केल्यामुळे आणि निधी उपलब्ध झाल्यामुळे बंद अवस्थेत असलेली कामे पुन्हा सुरू झाली असून, चार तलावांचे मोठी कामे लवकरच पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी वरजाई इंटरपाईजेस आणि सुमित स्पोर्ट्स या दोन कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली असून लवकरात लवकर त्यांच्याकडून काम पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
कोरोनामुळे ठेकेदाराला कामाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– सुषमा शिंदे, सहायक आयुक्त क्रीडा विभाग