पुणे

शिरूरमधील बारा गावांचा पाणीप्रश्न सोडविणार ; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील दुष्काळी 12 गावांना पाणी कोठून व कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत तीन महिन्यांत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्याची ग्वाही फडणवीस यांनी पाणी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना दिली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने बुधवारी (दि. 13) नागपूर येथे आयोजित बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, निरंजन डावखरे, मेघना बोर्डीकर साकोरे व बारा गावांच्या पाणी संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी सर्व योजनांबरोबरच उपसा जलसिंचन योजनांबाबतही चर्चा झाली. शिरूरसाठी खेडमधील प्रकल्पांमधून पाणी उचलताना चाकण व संपूर्ण खेडचा विचार करावा, अशी सूचना आ. मोहिते यांनी केली. बारा गावाना डिंभे धरणातून पाणी मिळावे, अशी मागणी पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी केली.

प्रश्न जटील असला, तरी 12 गावांना पाणी तर द्यावेच लागणार आहे. पाणी देताना इतरांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती आढळराव यांनी केली. माजी जि.प. सदस्य जयश्री पलांडे व अ‍ॅड.अशोक पलांडे यांनी कळमोडी तसेच थिटेवाडी प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी केली. हे काम सर्व्हेक्षणात घेण्याचे फडणवीस यांनी सांगितले. कळमोडीबाबत वळसे पाटील यांनी माहिती देत समन्वयाने मार्ग काढण्याची सूचना केली. यावर फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यात यश मिळालेला पर्याय सांगितला. 12 गावांसाठी उपलब्ध पाणीस्रोतांसह संपूर्ण जलसाठ्याचे पुनर्वाटप, सर्व्हेक्षण करू. कोणाच्याही वाट्याचे पाणी कमी न करता 12 गावांसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी माजी सभापती प्रकाश पवार, प्रमोद प-हाड, भरत साकोरे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, माजी सरपंच सोपानराव जाधव, मारुती शेळके, दादा खर्डे, संपत कापरे, सनी थिटे, समाधान डोके, सुधीर पुंडे, मल्हारी काळे, दादा उकिर्डे, अर्जुन भगत, योगेश कदम, विजय घोलप आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT