पुणे

लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगण्याची वेळ ; 12 गावांतील शेतकर्‍यांच्या मेळाव्यात निर्णय

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील 12 गावांच्या पाणी आंदोलनाचे आक्रमक स्वरूप राहील. या भागाचे लोकप्रतिनिधित्व करणारे सर्वच नेते सत्तेत सहभागी आहेत. सर्वच नेते सत्तेत असल्याचे प्रथमच असे घडत आहे. हा भाग पाण्यापासून वंचित असल्याचे सर्वच लोकप्रतिनिधींना ज्ञात आहे. पुढील पंचवार्षिकला मतदारसंघ विभागू शकतात. यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नये. दुष्काळग्रस्त भागाला पाणी येण्याची हीच वेळ संधी असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याबाबत प्रत्येकाने आपल्या नेत्याला ठणकावून सांगण्याची वेळ असल्याचा निर्धार केंदूर येथे दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समितीने आयोजित केलेल्या 12 गावांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

संबंधित बातम्या : 

याचबरोबर एकीकडे आंदोलन सुरू असताना प्रशासन व लोकप्रनिधी यांच्यासोबत चर्चेची कवाडे खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विचारविनिमय, बैठका, ग्रामसभांचे ठराव, शासनदरबारी निवेदनाची पूर्तता केल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी केंदूरला बारा गावांतील शेतकर्‍यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. त्या वेळी बोलताना शेतकरी व आंदोलकांनी आंदोलन उग्र स्वरूपाचे करण्याची मागणी केली.

आपल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना बारा गावांतील दुष्काळग्रस्त प्रश्नाची जाणीव आहे. त्यांना याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाही. यामुळे लोकप्रतिनिधींच्या दरवाजात न जाता त्यांनी गावात येऊन शेतकरी तसेच नागरिकांना सामोरे जाऊन याबाबत ग्वाही द्यावी, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. या सभेला संबोधित करताना माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सर्व पक्षकार्यकर्त्यांना सल्ला दिला की, प्रत्येकाने त्यांच्या लोकप्रतिनिधींना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे सांगावे; अन्यथा गावामध्ये येऊ नका, असे आक्रमकपणे सांगा. नेत्यांच्या पुढे-पुढे करणारे व आंदोलनात फूट पाडू पाहणार्‍यांना वेळीच ओळखून त्यांना बाजूला ठेवा. एकजुटीनेच आंदोलन केल्यास लढ्याला यश येईल व आपण या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले. या वेळी पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, कान्हूर मेसाई, वरुडे, सोनेसांगवी, मलठण, मिडगुलवाडी, चिंचोली-मोराची, हिवरे या गावांचे आजी-माजी सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आंदोलकांना प्रतिसाद
या आंदोलनाची आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत आंदोलकांना प्रतिसाद दिला आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन प्राप्त झाल्यानंतर दि. 7 ऑक्टोबर रोजी भीमाशंकर कारखाना या ठिकाणी 12 गावांतील प्रतिनिधी व नागरिकांना पाणी प्रश्नावर चर्चेसाठी बैठक आयोजित केल्याचे कळविले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी दोन दिवसांत बैठक आयोजित करण्याबाबत कळविले असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याबाबत माहिती देऊन प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न करणारा असल्याचे सांगितले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रश्नाची दखल घेतल्याचे सांगत बारा गावांतील शेतकरी ज्या ठिकाणी सांगतील तेथे स्वतः येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

SCROLL FOR NEXT