पिंपरी : शिक्षण फक्त पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट साध्य होणे गरजेचे आहे. शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड देत विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण कसे देता येईल याकरिता मनपा शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यासाठी उपक्रमशील शिक्षिका योगिता सोनवणे या दरवर्षी काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. त्यांनी भिंतीवर रंगवलेली चित्रे व काढलेल्या गणिताच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीही बोलक्या झाल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची शिक्षणात रुची वाढत आहे. योगिता या जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण या विषयावर काम करणार्या वेध परिवार या समूहात कार्यरत आहेत.
वेध गोष्टी या सदरात शिक्षकांसाठी प्रेरणादायी गोष्टी, बालकांसाठी गोष्टी व गोष्टी आव्हानांच्या अशा 88 व्हिडिओजची निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी गणित मूलभूत संकल्पना विषयक 60 व्हिडीओजची मराठी व हिंदी भाषेतून निर्मिती केली आहे. याशिवाय त्या उत्तम फलक लेखन करतात. वर्षातील दिनविशेष व महत्त्वाच्या दिवशी सुंदररित्या फळा सजवितात.
योगिता या सोनवणे वस्ती येथील मनपा शाळेत शिक्षिका आहेत. त्या उत्तम चित्रकार देखील आहेत. त्यांनी त्यांच्या या कलेचा उपयोग शिक्षणात आमूलाग्र बदल आणण्यासाठी केला. त्यांनी त्यांच्या वर्गापासून चित्राव्दारे शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. यामध्ये शाळेच्या भिंती रंगवण्यात आल्या. भिंतीवर विविध चित्रे, गणितांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची गोडी लागली.शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी जेव्हा शाळेला भेट दिली. त्यावेळी हा उपक्रम पुढे जावून इतर मनपा शाळांत राबविला गेला.
लहान मुले जिथे शिक्षण घेतात त्याठिकाणच्या सभोवतालच्या वातावरणातून त्याच्यावर संस्कार होतात. अभ्यासाशिवाय इतर अनेक गोष्टींमधूनही ते सतत काहीतरी शिकत असतात. या उप्रकमात शाळेच्या प्रवेशव्दारापासून, पायर्या, भिती, वर्गखोल्या अशा सर्व ठिकाणी चित्रे काढून पुस्तकातील अभ्यास बोलका करण्यात आला आहे. इमारतीच्या भिंती, वर्गातली फरशी, खेळण्याची जागा, आजूबाजूला असलेली झाडे त्यावर मराठी, गणित, विज्ञान, इतिहास,अंक-अक्षरांसोबत विविधरंगी चित्रांनी सजविण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात पत्राद्वारे पालकांत जनजागृती
लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शिक्षकांसमोर खुला झाला. नंतर ऑनलाइन शिक्षणाविषीयची अभिरुची कमी झाल्याने क्लासला उपस्थिती कमी होत चालली आहे. तसेच ऑफलाइन शिकणार्या विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही म्हणावे तसे शिक्षण पोहचत नव्हते. त्यामुळे पालकांचे देखील शिक्षणाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. यासाठी योगिता सोनावणे यांनी 'पालकांस पत्र'हा उपक्रम हाती घेतला आहे. पत्राव्दारे केलेल्या समुपदेशाने शिक्षणासाठी पालकांची साथ मिळून मुलांचे शिक्षणही सुरळीत सुरु झाले.
मुलांपर्यंत पोहचण्यासाठी पालकांशीच खूप चांगला संपर्क, संवाद असण्याचे अतिशय गरजेचे आहे हे त्यांना जाणवले. या उपक्रमात वर्गातील मुलांच्या पालकांस पत्रे लिहिली व घरी जाऊन पत्र दिले, त्यांना ते पत्र वाचून दाखवून त्यांच्याशी गप्पा मारत, त्यावेळी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची भूमिका व साथ यांची गरज याचे महत्त्व सांगितले.
पटसंख्या वाढविण्यासाठी भेटवस्तू उपक्रम
कोरोनानंतर शाळा सुरू झाल्या तरी मुले शाळेत यायला घाबरत होती. त्या वेळी एकही दिवस गैरहजर न राहणार्या विद्यार्थ्यांना छोटीशी भेटवस्तू देण्याचा उपक्रम सुरू केला. असे करता करता मुले भेटवस्तू मिळण्याच्या आशेने शाळेत येऊ लागली. त्यांची शिक्षणाची आवड वाढू लागली.
हेही वाचा