पुणे

पुरंदरमधील वारीची वाट या वर्षीही बिकट; वृक्षतोडीमुळी उन्हातच करावी लागणार वारी

Laxman Dhenge

वाल्हे : आषाढी वारीसाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे दि. 29 जूनला प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते निरा यादरम्यान पुरंदर तालुक्यातील 50 किलोमीटरच्या पालखी मार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने सुरू असून, झाडांची कत्तल झाल्यामुळे या वर्षीही वारकर्‍यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून दि. 2 ते 6 जुलै या 5 दिवसांत मार्गस्थ होणार आहे.

तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणार्‍या सावलीत वारकरी विसावा घेत होते. मात्र, मागील 2 वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावलीच राहिलेली नाही. पायी चालताना थोडावेळ उसंत घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. तर, वारकर्‍यांना पूर्णपणे उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे.

सासवड ते जेजुरी या मार्गाचे चौपदरीकरण देखील काही ठिकाणी अर्धवट आहे. तर अनेक ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण आहेत, अशा ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. पालखी सोहळ्याच्या एक-दोन दिवस आधी सुरक्षेची तकलादू साधने लावली जातात. मात्र, पालखी परतीच्या प्रवासाआधीच ती नाहिसी झालेली असतात. पुन्हा 12 महिने या मार्गावरून जाणार्‍या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जेजुरी औद्योगिक वसाहत ते निरा या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.

या मार्गावर 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे होती. दौंडज खिंड ते पिसुर्टी कमानीपर्यंतचे काम मागील 2 वर्षांपासून सुरूच आहे. या कामातही जुन्या रस्त्याच्या कडेची सर्वच्या सर्व झाडे तोडून टाकली आहेत. त्यामुळे भविष्यात पालखी मार्ग रुंद होईल पण किमान 10 वर्षे तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्षप्रेमी बोलत आहेत. पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात दाखल होण्यास अद्याप 50 दिवस बाकी आहेत. मात्र, या दरम्यान, पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणे शक्य वाटत नसून, या वर्षीही तालुक्यातून पायी पालखी सोहळा अडखळतच जाईल अशी चर्चा तालुक्यातील गावा-गावांत होत आहे.

दौंडज खिंडीतील विसावास्थळ भकास

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामानंतर दुसर्‍या दिवशी वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहरीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळसह अगदी छोटी बोराची झाडेही काढल्याने विसावास्थळ भकास झाला आहे. शिवाय या ठिकाणी नुकतेच झालेले, रेल्वेचे लोहमार्गावर विस्तारीकरण व पालखी महामार्ग रुंदीकरण यामुळे मातीचे भराव टाकल्याने सोहळ्याच्या न्याहरीसाठी मोठे अडथळे निर्माण होणार आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT