पुणे: धाराशिवच्या शांत, निवांत सकाळात जेव्हा अजूनही रात्र आपला अंमल गाजवत असते, तेव्हा एक गोड, लयबद्ध आवाज घुमतो, ‘वासुदेव आला हो... वासुदेव आला...! सकाळच्या पारी हरिनाम बोला...!‘ हा आवाज असतो पांडुरंग केशव वायकर यांचा.
जे गेल्या 28 वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी जपलेली वासुदेवाची परंपरा आजही मोठ्या निष्ठेने पुढे नेत आहेत. आणि दरवर्षी न चुकता ते वारीमध्येही परंपरेप्रमाणे सहभागी होत आहेत. (Latest Pune News)
आजोबा, पणजोबांपासून अनेक पिढ्यांनी पहाटेच्या अंधारात लोकांना जागे करण्याचे आणि लोकगीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम वासुदेवाच्या वेशातून केले आहे. पांडुरंग वायकर सांगतात की, त्यांच्या कुटुंबासाठी वासुदेव म्हणजे फक्त एक वेश नाही, तर ती एक धार्मिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.
त्यांच्या मते, वासुदेव म्हणजे केवळ भीक मागणे नव्हे, तर तो संस्कृतीचा आणि परंपरेचा दूत आहे, जो पहाटेच्या शांततेला भक्तिरसाने आणि लोकजागरणाने भारून टाकतो. परंतु, आजच्या बदलत्या काळात ही परंपरा टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे.
पूर्वी लोक पहाटे उठून वासुदेवाचे स्वागत करीत असत त्याच्या मुखातून निघणार्या हरिनामात आणि लोकगीतांमध्ये रमून जात असत. मात्र, आता जीवनशैली बदलली आहे. वासुदेव ही केवळ उपजीविकेची साधन नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा आणि संस्कारांचे प्रतीक आहे, असे त्यांनी दैनिक ’पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.