

पुणे: राज्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांचा टक्का आणखी वाढला आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र 144 लाख 36 हजार 54 हेक्टर इतके असून, 20 जूनअखेर 33 लाख 59 हजार 81 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 23.27 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. जमिनीला वाफसा येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे विशेषतः सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, मका, बाजरीच्या पेर्यात वाढ झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
राज्यात मे महिना आणि जून महिन्यातही सलग पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये रखडल्याचे चित्र मागील आठवड्यापुर्वी होते. त्यामुळे राज्यात सरासरीच्या जेमतेम आठ टक्केच पेरण्या पूर्ण होऊ शकल्या होत्या. (Latest Pune News)
संपणार्या आठवड्यात पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांच्या पेरण्यांखालील टक्का वाढण्यास काहीशी मदत झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीत चांगली वाढ झालेली असल्याचे सांगण्यात आले.
खरीप हंगामातील मुख्य पीक हे सध्या सोयाबीन आहे. सोयाबीनखाली सरासरी क्षेत्र तब्बल 47 लाख 21 हजार 488 हेक्टरइतके आहे. त्यापैकी सुमारे 11 लाख 54 हजार 461 हेक्टरवरील पेरणी म्हणजे 24 टक्के सोयाबीनची पेरणी पूर्ण झालेली आहे. त्या खालोखाल कापूस पिकाचे 42 लाख 47 हजार 212 हेक्टर क्षेत्र आहे. तर प्रत्यक्षात 11 लाख 53 हजार 489 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 27 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झालेली आहे.
मका पिकाखालील क्षेत्रातही अलीकडे वाढ होत आहे. मक्याचे 9.33 लाख हेक्टरपैकी 3.66 लाख हेक्टरइतक्या क्षेत्रावरील म्हणजे 39 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण होऊ शकलेली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे विशेषतः कमी पावसाच्या भागात घेतल्या जाणार्या बाजरीच्या पेरण्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. कारण बाजरीच्या 4.81 लाख हेक्टरपैकी आत्ताच 1.08 लाख हेक्टरवरील म्हणजे 23 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
पावसाने बर्यापैकी उसंत घेतल्याने विदर्भ-मराठवाड्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना गती आलेली आहे. त्यामुळे पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ होत असून, सद्यःस्थितीत 23.27 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जमिनीला वाफसा आल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रातही चांगली वाढ होईल. सद्यःस्थितीत सोयाबीन, कापूस आणि बाजरी, मका, कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात मागील आठवड्याच्या तुलनेत अधिक वाढ झाली आहे.
- वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे