पुणे: लोकशाही व्यवस्थेत सध्या आपण संक्रमणाच्या काळातून जात आहोत. अनेक आव्हाने समोर आहेत. लोकशाही वाचवण्याची गरज आहे, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकशाहीचा आत्मा हरवत चालला आहे, अशी स्पष्ट चिंता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच शिमला करारात स्पष्ट आहे की भारत-पाकिस्तानच्या संबंधात कोणतीही तृतीय मध्यस्थी होणार नसल्याची तरतूद असल्याचेही चव्हाण म्हणाले.
पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, संज्ञापन व वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे, गिरीश अवघडे, डॉ. नीरज जाधव, बी. जे. कोळसे पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते. (Latest Pune News)
चव्हाण म्हणाले, लोकशाही संपली नसली तरी तिचा आत्मा निघून गेला आहे. फक्त ढाचा उरलेला आहे. निवडणुका होत आहेत, पण त्यामध्ये आत्मा नाही. राजकीय पक्षांमध्ये आता अंतर्गत लोकशाही शिल्लक राहिलेली नाही.
संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल. मात्र सध्याच्या माध्यमांच्या कार्यपद्धतीबाबत मला चिंता वाटते. अनेक चॅनल्सवर खोट्या बातम्या दाखवल्या जात आहेत. अशा चॅनल्सवर बंदीची कारवाई झाली पाहिजे.
चव्हाण पुढे म्हणाले, लोकशाही अध्यक्षीय असावी की संसदीय, यावर चर्चा झाली तेव्हा संसदीय लोकशाही स्वीकारली गेली. पक्षांतर बंदी कायद्यात बदल झाल्याने आज राजकीय लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे. अन्यथा संसदेची हत्या होईल. कारण सत्ता म्हणेल, तेच ऐकून घेणे हे गंभीर आहे. लोकशाही वाचवण्यासाठी माध्यमांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे असे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली चिंता