Board Exam Result Maharashtra
गणेश खळदकर
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. राज्य मंडळाकडे 21 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध झाले आहेत. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल डिजिलॉकर अॅपमध्ये पाहता येणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करून राज्य मंडळ निकालाची डेडलाइन पाळणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर घेण्यात आल्या. परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले.
तसेच, क्रीडागुणांची नोंद करण्यासाठी 21 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे क्रीडागुणांसह सवलतीचे गुण राज्य मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीपासून दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात येत आहेत. त्यामुळे हे गुणदेखील वेगाने राज्य मंडळाला प्राप्त झाले आहेत.
राज्य मंडळाच्या अधिकार्यांकडून विभागीय मंडळे तसेच शाळा-महाविद्यालयांकडे निकालाच्या कामासंदर्भात सतत पाठपुरावा करण्यात आला. यावर्षी शिक्षकांनी देखील पेपर तपासणीवर बहिष्कार घातला नाही. त्यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया वेगवान पद्धतीने पूर्ण झाली. त्यामुळे राज्य मंडळाला निकालाची जय्यत तयारी करता आली.
राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कळवावेत, असे शाळा-महाविद्यालयांना आवाहन केले होते. त्यानुसार दहावी-बारावीला बसलेल्या तब्बल 31 लाख विद्यार्थ्यांपैकी 21 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी राज्य मंडळाला प्राप्त झाले आहेत.
आता ज्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या डिजिलॉकर अॅपमध्ये निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
देशातील एकमेव महाराष्ट्र राज्य आहे, ज्या राज्यातील तब्बल 87 टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहेत. त्यातील 60 ते 65 टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी राज्य मंडळाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कायमस्वरूपी त्यांना थेट डिजिलॉकर अॅपमध्ये उपलब्ध होईल, ज्याचा भविष्यात संबंधित विद्यार्थ्यांना कोठेही उपयोग करता येणार आहे.
राज्याचे प्रशासन, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटनादेखील कमी झाल्या. परीक्षोत्तर जे काम आहे, यामध्ये पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ