नवजात शिशूंच्या मृत्यूचे यंदा वाढले प्रमाण; बालमृत्यू रोखण्यासाठी योजनांमध्ये कालानुरूप बदल file photo
पुणे

नवजात शिशूंच्या मृत्यूचे यंदा वाढले प्रमाण; बालमृत्यू रोखण्यासाठी योजनांमध्ये कालानुरूप बदल

आरोग्यविषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, दोन वर्षांपासून बालमृत्यूचा दर चढाच आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, आलेख उतरता राहावा, यासाठी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची आणि जुन्या योजनांनी कात टाकण्याची गरज अधोरेखित होत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये 214 बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2023-24 मध्ये बालमृत्यूची संख्या 792 इतकी वाढली; म्हणजेच 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये चारपटीने वाढली. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने 2024-25 मध्ये ही संख्या 553 इतकी नोंदवली आहे. मात्र, बालमृत्यू आणखी कमी करण्यासाठी महापलिकेला नव्याने धोरणांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.(Latest Pune News)

बालमृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘जननी सुरक्षा योजना’, ‘मिशन इंद्रधनुष’, ‘राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम’, ‘नवजात शिशू कक्ष सुविधा’ अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. पुणे महापालिका क्षेत्रातही सुधारित सेवांसह लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहेत. या योजनांमुळे नवजात शिशूंच्या वेळेवर तपासण्या, उपचार आणि लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

काय सांगतात तज्ज्ञ?

बालमृत्यूचे मूळ कारण हे कुपोषण, प्रसूतीपूर्व काळजीचा अभाव, वेळेवर उपचारांची उपलब्धता नसणे आणि नवजात काळातील संसर्ग हे आहेत. नवजात शिशूंच्या पहिल्या 28 दिवसांतील मृत्यू रोखण्यासाठी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी माता व बालसंगोपन केंद्रांची गुणवत्ता सुधारावी, अंगणवाडीसेविका व आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण अधिक मजबूत करावे आणि लोकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या राबविल्या जाणार्‍या महत्त्वाच्या योजना

1. जननी सुरक्षा योजना - सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत

2. मिशन इंद्रधनुष - पूर्ण लसीकरणावर भर

3. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (आरबीएसके)

शालेय व बालआरोग्य तपासणी

4. एसएनसीयू - नवजात शिशूंसाठी विशेष कक्ष

5. मातृवंदना योजना

बालमृत्यू वाढण्याची कारणे

  • बाळांचे कमी वजन

  • मुदतपूर्व जन्म

  • गर्भावस्थेतील अपुरी काळजी

  • वेळेवर उपचारांचा अभाव

काय करावे लागेल?

  • आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

  • मातृत्व व नवजात सेवा सुधारणा

  • संपूर्ण लसीकरण

  • जागृती मोहिमा

बालमृत्यूंचे प्रमाण (स्रोत : महापालिका आरोग्य विभाग)

वर्ष - बालमृत्यू

2022-23 - 214

2023-24 - 792

2024-25 - 553

बालमृत्यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजारी नवजात बालकांच्या उपचारांसाठी विशेष कक्ष आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, अ‍ॅनिमिया मुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे.
डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT