पुणे

खाणीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर! धानोरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Laxman Dhenge
[author title="संतोष निंबाळकर" image="http://"][/author]
धानोरी : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी-धानोरी रस्ता परिसरात असलेल्या खासगी मालकीच्या दगड खाणीत अनेक वर्षांपासून अस्वच्छ पाणी साठून आहे. त्यावर प्लास्टिक कचर्‍याचे ढीग तरंगताना दिसत आहेत. मासे व चिकन विक्रेते निरुपयोगी मांस रात्रीच्या वेळी खाणीत आणून टाकतात. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना अक्षरशः नाक दाबून जावे  लागते. खाणीच्या स्वच्छतेची मागणी होत असताना महापालिका प्रशासन मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
धानोरी परिसरात सुमारे पाऊण एकर क्षेत्रात ही खाण पसरली आहे. खाणीची सीमाभिंत कमी उंचीची आहे. त्यामुळे नागरिक प्लास्टिकच्या पिशवीत भरून घरातील कचरा खाणीत टाकतात. त्यामुळे पाण्यावर प्लास्टिक कचर्‍याचे ढीग तरंगताना दिसत आहेत. माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी 2015 पासून वेळोवेळी येरवडा क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आदी विभागांशी पत्रव्यवहार करून खाणीच्या स्वच्छतेची मागणी केली आहे. पण, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही  झालेली नाही.
या खाणीवर वॉटर स्पोर्ट्स व निवासी आरक्षणाबाबत न्यायालयात खटला प्रलंबित आहे. वॉटर स्पोर्ट्सच्या आरक्षणावर काही संस्थांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दशकांमध्ये या खाणीत शेकडो आत्महत्या झाल्याचेही बोलले जाते. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता खाणीच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशीच नागरिकांची मागणी आहे.

पाहणी करून उपाययोजना करणार

खाणीच्या सीमाभिंतीला जाळी बसविण्यासाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांचा निधी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्य पथ विभागाकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. खाणीच्या स्वच्छतेसंदर्भात पाहणी करून उपाययोजना करण्यात येतील. कर्मचारी नियुक्त करून खाणीत कचरा टाकणार्‍यांना प्रतिबंध करण्यात येणार असल्याचे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक यांनी सांगितले.
खाणीतील कचर्‍यामुळे सुमारे एक किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी व आरोग्याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. संरक्षक भिंतीला जाळी बसविण्यात यावी. खाणीची स्वच्छता करावी, यासाठी दहा वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
– अनिल टिंगरे, माजी नगरसेवक
खाणीतील कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा भिंतीवर जाळी बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. प्रशासनाने तातडीने खाणीची स्वच्छता करावी.
– रेखा टिंगरे, माजी नगरसेविका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT