शंकर कवडे
पुणे: गणेश विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर, घाटांवर तसेच फिरते कृत्रिम विसर्जन हौद व मूर्तिदानाचा पर्याय पुणेकरांनी यापूर्वीच स्वीकारला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याचा पेच शहरात निर्माण होणार नाही. पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा ‘पुणे पॅटर्न’ हा राज्यभरात हिट ठरणार असल्याचे चित्र आहे.
शहरातील मूर्तिशाळांमध्ये सहा इंचांपासून दहा फुटांपर्यंतच्या मूर्ती घडविल्या जातात. यामध्ये 80 टक्के मूर्ती पीओपी, तर 20 टक्के मूर्ती शाडूपासून घडविण्यात येतात. मात्र, शाडूच्या मूर्तीचा वापरा, पीओपी नको, अशी मोहीमच प्रामुख्याने पर्यावरणवादी संस्थांनी उघडल्याने न्यायालयानेही पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी आणली होती. (Latest Pune News)
पीओपीच्या गणेशमूर्तीवरील बंदीच्या निर्णयानंतर दैनिक ‘पुढारी’च्या वतीने याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर सोमवारी न्यायालयाने बंदी उठविल्याने शहरातील मूर्तिशाळांमध्ये पीओपीच्या मूर्ती घडविण्याच्या कामाला वेग आला आहे.
दरम्यान, मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत 30 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहे. त्याचा पुण्यात काही परिणाम होणार नाही. कारण, शहरातील बहुतांश सार्वजनिक मूर्ती या फायबरपासून तयार केल्या आहेत.
तसेच, शहरात सार्वजनिक गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची परंपरा नाही. पीओपीबंदीमुळे घरगुती पीओपी गणेशमूर्तींचा प्रश्न निर्माण झाला होता. तोही न्यायालयाच्या निर्णयामुळे मिटला असल्याचे गणेशभक्तांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
अमोनियम क्लोराइड म्हणजे खाण्याचा सोडा. हे मिश्रण आम्हीच प्रथम तयार केले. ते राष्ट्रीय फर्टिलायझर या केंद्र शासनाच्या कंपनीकडून उत्पादित केले जाते. महापालिकेला मोफत पुरवठा केला जात होता.
महापालिका ते सार्वजनिक स्वरूपात वाटत असे. हा प्रयोग पाच वर्षे सुरू होता. मात्र, कोरोनानंतर महापालिकेने ते थांबविले. आम्ही आता फक्त संस्थेतील कर्मचार्यांना ते गणपती विसर्जनासाठी देतो, अशी माहिती हे मिश्रण तयार करणार्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. शुभांंगी उंबरकर यांनी दिली.
पीओपी मूर्तीच्या पर्यावरणपूरक विसर्जनाच्या पद्धतीचा पुणेकरांनी यापूर्वीच अवलंब केला आहे. जवळपास चार ते पाच प्रकारे पीओपींच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडते. या सर्व गोष्टींचा शासनासह न्यायालयाने विचार केल्याने पीओपीच्या मूर्तींचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाच्या निर्णयानंतर मूर्तिशाळांमध्ये मूर्ती घडविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या वेळ कमी आहे. मात्र, घरोघरी गणेशमूर्ती पोहचाव्यात, यादृष्टीने रात्रंदिवस काम करण्यात येत आहे.- गणेश कुंभार, मूर्तिकार, जय गणेश आर्ट्स, लोहगाव
मंडळाची मूळ मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली असून, ती मंदिरात विराजमान असते. गणेशोत्सवासादरम्यान फायबरपासून घडविण्यात आलेली मूर्ती उत्सवमूर्ती म्हणून मंडपात विराजमान होते. शहरातील बहुतांश मंडळाच्या गणेशमूर्ती फायबरपासून घडविण्यात आल्या आहेत. शहरात दरवर्षी मूर्ती विसर्जन करण्याची परंपरा नाही. याखेरीज मूर्तींची उंचीही पाच फुटांपर्यंत असते. त्या कृत्रिम हौदात सहज विसर्जित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्तींचा विसर्जनाचा पेच शहरात निर्माण होण्याची सुतरामही शक्यता नाही.- सागर भोसले, माजी अध्यक्ष, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ