लोणी काळभोर: राज्यात महसूल विभागात कोणत्याही खात्यात हवेली तालुक्यात नेमणूक व्हावी म्हणून प्रचंड स्पर्धा, मोठी चढाओढ लगलेली असते. मोठी राजकीय ताकद वापरून आर्थिक मलिदा देऊन हवेली तालुक्यातील महसूल विभाग पदरात पाडून घेतला जातो. अशी स्थिती असताना गेले दोन महिने झाले हवेली भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षकपद मात्र रिक्त पडले आहे. मलईदार ’हवेली’ सगळ्यांनाच नकोशी झाली आहे.
या पदासाठी राज्यातील कोणीही अधिकारी येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हवेली भूमिअभिलेख विभागात येण्यास कोणताही अधिकारी धजावत नाही, असे चित्र पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या हवेली भूमिअभिलेखला कोणी अधिकारी देता का? असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Latest Pune News)
महसूल विभागात राज्यात सर्वांत मलईदार असा हवेली तालुका समजला जातो. येथे येण्यासाठी अधिकार्यांना मोठा आर्थिक मलिदा देऊन, मोठी स्पर्धा पार करून चांगला वशिला लावून हवेलीत विराजमान व्हावे लागते. हवेली तालुका हा राज्यातील अत्यंत संवेदनशील तालुका आहे. येथील भूमिअभिलेख विभाग हा अनेक कारणांनी बदनाम झाला आहे.
चौकशीचा ससेमीरा लागण्यापेक्षा या पदावर येणे नकोच, असा पवित्राच अधिकार्यांनी घेतला काय? असे चित्र पाहावयास मिळत आहे. एकही दिवस रिक्त न राहणारे कार्यालयीन प्रमुखपद गेले दोन महिने रिक्त आहे.
तात्पुरता पदभार घेणे हे जिकिरीचे असल्याने येथे कोणीही टिकेना, अशी अवस्था या कार्यालयाची झाली आहे. शिस्तबद्ध व परखड, आक्रमक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात हवेली भूमिअभिलेख विभागाला अधिकारी मिळेना, अशी अवस्था झाली आहे.
भूमिअभिलेख हवेली कार्यक्षेत्रात बारा आमदार, चार खासदार, मंत्री, अधिकारी यांचे कार्यक्षेत्र येते. येथे येणारी 80 टक्के कामे ही लोकप्रतिनिधींच्या शिफारशींची असतात. अर्थात, याबरोबरच पैशाचा खेळ मोठा आहे. यामध्ये मोह आवरता आला नाही, तर अधिकार्याच्या करिअरची माती झाली म्हणून समजा, अशी स्थिती या हवेली तालुक्याची आहे. अनेक व्यवधान सांभाळून येथे काम करावे लागते.
लक्ष्मीप्राप्ती आहे; मात्र तणाव मोठा असतो.तत्काळ कामे करावी म्हणून तगादा असतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीत तीन पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांना हवेलीमध्ये सांभाळणे अतिशय अवघड काम असते, या सर्वांमुळे अधिकारी येथे यायला धजावत नाहीत.
या सर्व प्रकारांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदामुळे सामान्य जनता, शेतकर्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे हवेलीला तत्काळ भूमिअभिलेख अधिकार्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.