अवैध धंद्यांविरुद्ध निवेदन देणार्‍या युवकांवरच पोलिसाची दादागिरी; खेड पोलिस ठाण्यातील अजब प्रकार Pudhari
पुणे

Pune: अवैध धंद्यांविरुद्ध निवेदन देणार्‍या युवकांवरच पोलिसाची दादागिरी; खेड पोलिस ठाण्यातील अजब प्रकार

राजगुरुनगर शहर परिसरात आणि गावोगावी अवैध दारू, गांजा विक्रीचा सुळसुळाट

पुढारी वृत्तसेवा

खेड: राजगुरुनगर शहर परिसरात आणि गावोगावी अवैध दारू, गांजा विक्रीचा सुळसुळाट झाला असून मटका जुगारही सुरू आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन खेड पोलिस ठाण्यात द्यायला आलेल्या युवकांच्या हातातील कागद हिसकावून घेतले. त्यावरून विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा? अशी थेट दमबाजी एका पोलिसाकडून करण्यात आल्याची तक्रार संबंधित युवकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्याकडे केली आहे.

स्वप्निल गायकवाड (रा. चास), तुषार गायकवाड आणि नीलेश ठाकूर (दोघेही रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) अशी तक्रारदार युवकांची नावे आहेत. या युवकांच्या गावपरिसरात अवैध धंद्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हीन वागणूक दिल्याच्या निषेधार्थ तसेच तक्रारींची दखल घेतली नाही तर मंगळवारी (दि.13) खेड पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (latest pune news)

खेड तालुक्यात अवैध दारू, गांज्या, ताडी सर्रास विक्री होत असून मटका, जुगारही सुरू आहे. ज्यामुळे गावोगावच्या नागरिकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहेत. खेड तालुक्यातील मागील काही महिन्याच्या गुन्ह्यांचा विचार करता गावोगावी वाढलेल्या अवैध धंद्यांचा परिणाम समोर येत आहे.

लहान, अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या युवकांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन धडक कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, बुधवारी (दि. 7) खेड पोलिस ठाण्यात मिळालेल्या हीन वागणूक व बेदखलपणामुळे युवकांना वेगळाच अनुभव आला आहे.

खेडच्या पोलिस प्रशासनाला त्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्रीसारखे धंदे बंद करण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी विशेष बैठकीत असल्याचा संदेश दिला.

पोलिसांना निवेदन देऊन बाहेर आल्यावर काही वेळात तक्रारदार युवकांना अवैध धंदेवाल्यांचा मोबाईलवर संपर्क सुरू झाला. काही असेल तर मिटवून घेऊ. महिन्याला ठराविक रक्कम घ्या पण तक्रार करू नका, असे सांगण्यात आले. पोलिसांना निवेदन दिल्यावर ’त्या’ धंदेवाल्यांना तत्काळ माहिती मिळणार असेल तर न्याय कसा मिळेल?
- तुषार सुरेश गायकवाड, तक्रारदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT