पुणे

Pune : भिगवण बसस्थानकाची दयनीय अवस्था

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्त्वाचे व तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भिगवण बसस्थानाकाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सायंकाळ सहानंतर तर वाहतूक नियंत्रक नसल्याने येथील बसस्थानक गैरकृत्याचा अड्डाच बनला आहे. रात्री-अपरात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना असुरक्षित व भयभीत अवस्थेत येथे वावरावे लागत आहे.
पुनर्वसित भिगवण गाव दळणवळणाच्या दृष्टीने केंद्रबिंदू मानले जाते. पुणे, सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा राज्यमार्ग असल्याने भिगवणचे बसस्थानक प्रवाशांसाठी खूपच महत्त्वाचे आहे.

या बसस्थानकात जवळच्या व लांब पल्ल्याच्या सर्व एस.टी. बसचा थांबा आहे. या बसस्थानाकातून मुंबई, पनवेल, पुणे तर सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, धाराशिव तसेच नगरसह करमाळा,बार्शी, कर्जत,जामखेड अशा येणार्‍या व जाणार्‍या एस.टी. बसच्या दिवसाच्या फेर्‍या 245 च्यावर आहेत, तर रात्रीच्या वेळी शंभर ते सव्वाशे फेर्‍या होतात. एवढ्या मोठ्या प्रवाशी वर्दळीच्या या बसस्थानकाची अवस्था अतिशय खिळखिळी व दयनीय झाली आहे. येथे पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय नाही की भोजन व्यवस्था नाही. बाकडे तुटलेल्या अवस्थेत आहेत.

या स्थानकात सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत वाहतूक नियंत्रकाची नेमणूक आहे. साहाजिकच त्यानंतर मात्र या बसस्थानकात मद्यपी तसेच अश्लील चाळे करणार्‍यांचा ताबा असतो. रात्री 11 पर्यंत प्रवाशी उतरणार्‍यांची संख्या लक्षणीय असते; परंतु येथील बसस्थानकातील स्मशान शांतता,अंधारचे साम्राज्य त्यात मद्यपी,अश्लील चाळे करणार्‍यांची कृत्ये पाहून प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडत आहे. रात्रीच्या वेळी हे बसस्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित बनले आहे. या स्थानकात किमान रात्री अकरापर्यंत तरी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात यावी तसेच रात्रीच्या वेळी सर्व एस. टी. बस थांब्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करमाळ्याचे माजी नगरसेवक फारुख जमादार व प्रवाशांनी दै. 'पुढारी'शी बोलताना केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT