पुणे

स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षाला करता येणार केवळ पाच दिवस कामकाज

backup backup

महापालिका 13 मार्चला बरखास्त होत असल्याने अल्प कालावधी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017-22 या पंचवार्षिकेचा कार्यकाळ 13 मार्च 2022 ला संपणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षास 1 ते 13 मार्च असा केवळ 13 दिवसांसाठी खुर्ची मिळणार आहे. मात्र, निवड प्रक्रिया व साप्ताहिक सुटी जाता प्रत्यक्ष पाच दिवसांचा कालावधी मिळेल.

महापालिकेच्या तिजोरीचा चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीचे सदस्य होण्यास सर्वच नगरसेवक खूपच उत्सुक असतात. या समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे व 16 पैकी 8 सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 28 फेबु्रवारीला संपणार आहे.

शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बोर्डे, भीमाबाई फुगे (सर्व भाजपा), पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर (दोघी राष्ट्रवादी काँग्रेस) याचा दोन वर्षांचा सदस्याचा कार्यकाळ संपत आहे. तर, समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे, सुजाता पालांडे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे (सर्व भाजप), मीनल यादव (शिवसेना), प्रवीण भालेकर, राजू बनसोडे (दोघे राष्ट्रवादी), नीता पाडाळे (अपक्ष) हे 8 सदस्य कायम राहणार आहेत.

महापालिका नियमानुसार नव्या आठ सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. ते सदस्य 1 मार्चपासून समितीचे सदस्य होती. तर, अध्यक्षपदासाठी अर्ज मागवून निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल. ती प्रक्रिया पूर्ण होऊन 7 मार्चला अध्यक्षाची निवड होईल.

त्यानंतर 13 मार्चपर्यंत नव्या अध्यक्षाला कामकाज करता येणार आहे. मात्र, 12 मार्चला शनिवार व 13 मार्चला रविवार असल्याने ते दिवस वगळून केवळ पाच दिवस नव्या अध्यक्षाला प्रत्यक्ष कामकाज करता येणार आहे.

त्या कालावधीत एक साप्ताहिक सभा व एक विशेष सभा घेता येईल. या अल्प कालावधीसाठी कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते ते पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

आठ सदस्यांमार्फत होऊ शकते 13 दिवस कामकाज

अध्यक्ष आणि 8 सदस्यांची निवड न केल्यास उर्वरित आठ सदस्यांमार्फत समितीचे कामकाज करता येते. त्या सदस्यांतून एकाची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करून नियमानुसार कामकाज करता येते. तो पर्याय सत्ताधारी भाजपकडून निवडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा आहे ते अध्यक्ष व सदस्यांना 13 दिवसांची मुदतवाढ दिली जाऊ शकते.

राज्य शासनाचे मार्गदर्शन घेणार : नगरसचिव

सध्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. महापालिका 13 मार्च 2022 ला बरखास्त होत आहे. एक ते 13 मार्च या केवळ 13 दिवसांच्या कालावधीसाठी स्थायी समितीच्या 8 नव्या सदस्यांची निवड व अध्यक्षाची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शन घेतले जाईल. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

अ‍ॅड. नितीन लांडगे सादर करणार अर्थसंकल्प

स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे हे महापालिकेचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सादर करतील. तिसर्‍या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करण्याचे नियोजन आहे. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्फत निवडणूक झाल्यानंतर नव्या सभागृहासमोर अर्थसंकल्प सादर केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT