भाजपच्या नव्या शहराध्यक्षांचे नाव लिफाफ्यात बंद; घाटेंसह बिडकर, भिमालेंच्या नावाला पुन्हा पसंती File Photo
पुणे

Maharashtra Politics: भाजपच्या नव्या शहराध्यक्षांचे नाव लिफाफ्यात बंद; घाटेंसह बिडकर, भिमालेंच्या नावाला पुन्हा पसंती

निरीक्षक देणार प्रदेशाध्यक्षांना अहवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भाजप शहराध्यक्षपदी कोणाची निवड होणार, हे आता निरीक्षकांच्या बंद लिफाफ्यात दडले आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी सभागृह नेते गणेश बिडकर व श्रीनाथ भिमाले यांच्या नावाला पदाधिकार्‍यांकडून पुन्हा पसंती देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या प्रमुख तीनपैकी एकाला संधी मिळणार की अनपेक्षितरीत्या नवीन चेहर्‍याला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

भाजपने संघटनात्मक बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार शहराध्यक्षांची नव्याने नेमणूक होणार असून त्यासाठी निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पुणे शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शेखर इनामदार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

इनामदार यांनी रविवारी शहराध्यक्ष निवडीसाठी पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली. शहरातील सर्व आमदार, खासदार, सरचिटणीस आणि प्रदेश प्रतिनिधी यांची गोपनीयरीत्या मते जाणून घेण्यात आली. प्रत्येक पदाधिकार्‍याला तीन नावे पसंती क्रमाने सुचविण्याचे बंधन होते. त्यानुसार पदाधिकार्‍यांनी आपल्या पसंतीने शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे सुचविली.

दरम्यानच्या अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिका निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी सरचिटणीस गणेश घोष इच्छुक आहेत. मात्र, निरीक्षकांपुढे बहुतांश इच्छुकांनी घाटे, बिडकर, भिमाले यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे काही पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतल्यानंतर आता त्या संबंधीचा गोपनीय अहवाल निरीक्षक प्रदेशाला सादर करणार आहेत. त्यामुळे आता शहराध्यक्षपदी नक्की कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे महिनाअखेरपर्यंत निश्चित होणार आहे.

बिडकर, घोष यांच्याकडून लॉबिंग

शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या गणेश बिडकर आणि गणेश घोष यांनी काही पदाधिकार्‍यांना फोन करून शहराध्यक्ष पदासाठी आपले नाव सुचवावे, अशी विनंती केल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तसेच बिडकर यांनी पुणे दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती.

तापकीर, कोंढरे आणि डहाळे यांच्याही नावाची चर्चा

भाजप शहराध्यक्ष पदासाठी निरीक्षकांकडे तीन नावे सुचविताना एक नाव महिलेचे असावे, अशीही अट होती. त्यात महिलांमधून माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांच्याही नावाला पसंती मिळाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT