खडकवासला (पुणे): राजगड किल्ल्याच्या अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून चारशे फूट खाली संजीवनी व सुवेळा माचीच्या वाटेवर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कोमल शिंदे (वय 23, सध्या रा. आळंदी, मूळ रा. परभणी) या विवाहित महिलेच्या मृत्यूचे गूढ दहाव्या दिवशीही कायम आहे. घातपात अथवा जाणीवपूर्वक कोमल यांचा मृत्यू घडवून आणला आहे का? याबाबत वेल्हे पोलिस सखोल चौकशी करीत आहेत.
कोमल शिंदे यांचा गेल्या आठवड्यात गुरुवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ल्यावरून चारशे फूट खाली कोसळून जागीच मृत्यू झाला. त्या चढताना पडल्या की उतरताना? याची नेमकी माहिती पोलिसांना मिळाली नाही. (Latest Pune News)
याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करीत आहेत. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.
वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले की, कोमल हिचा उंच बालेकिल्ल्यावरून कोसळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यामागे नेमके काय कारण आहे? हे समजू शकले नाही. घातपात अथवा जाणीवपूर्वक घटना घडवून आणली आहे का? याबाबत तपास सुरू आहे.
तपास पथकाचे प्रमुख, वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख म्हणाले की, मयत कोमल व पती सतीश शिंदे असे दोघे राजगड किल्ल्यावर गुरुवारी फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी गडावर पाऊस पडला होता, धुके होते.
मयत कोमल शिंदे यांना खाली पडताना कोणी पाहिले नाही. मात्र, वाचवा वाचवा, असा आवाज संकेत नावाच्या व्यक्तीने ऐकला होता. सर्व बाजूंनी या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. मयत कोमल यांचा कौटुंबिक छळ सुरू होता. याप्रकरणी तिने सप्टेंबर 2024 मध्ये परभणीतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत स्थानिक पोलिसांकडून माहिती मागितली आहे.
यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवतीची राजगडावर तिच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस कोमल शिंदे मृत्यूप्रकरणी अलर्ट मोडवर आहेत.
पती गडकोटांवर कशासाठी गेला होता?
कोमल शिंदे यांचा मृत्यू होण्याआधी तिचा पती सतीश हा राजगड, तोरणा, सिंहगड आदी गडकोटांवर येऊन गेला होता, अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. सतीश हा कशासाठी गडकोटांवर गेला होता? तसेच कोमलशी त्याचे कसे संबंध होते? आदी प्रश्नांची उकल पोलिसांकडून केली जात आहे.