पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुणवत्ता नियमांच्या निकषानुसार काम न झाल्याने सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा पिलर पाडण्यात आला. यावरून महापालिकेवर टीका झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदर पिलरचा अहवाल मागवला आहे. सिंहगड रस्त्यावर महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. यात ज्या भागात खांबांचे काम पूर्ण झाले आहे तेथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. संतोष हॉल चौक ते राजाराम पूल यादरम्यान गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाच्या गुणवत्तेची महापालिकेकडून वारंवार पाहणी केली जाते. या उड्डाणपुलाच्या कामात आतापर्यंत 1200 वेळा काँक्रिट तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडीदरम्यानच्या दहा पिलरची तपासणी झाली. हिंगणे येथील एका पिलरच्या सिमेंटची गुणवत्ता 'एम 35' असणे आवश्यक असताना ती 'एम 30' इतकी असल्याचे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल प्रकल्प विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर तेथील काम बंद करण्यात आले.
मनसेच्या आंदोलनाची दखल महापालिकेच्या सूचनेनुसार ठेकेदार कंपनीने गुणवत्ता निकषानुसार काम न झालेला पिलर पाडला. त्यावरून मनसेने आंदोलन केले असून, कारवाईची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्तांनीही गंभीर दखल घेत या प्रकरणी अहवाल मागविला असून, त्यानंतर कारवाई निश्चित केली जाणार आहे.
हेही वाचा :