पुणे

फळांचा राजा घेणार निरोप; ‘या’ कारणाने हंगाम 15 दिवस अगोदर संपणार

Laxman Dhenge

पुणे : ऐन हंगामात अतिउष्णतेमुळे आंबा मोठ्या प्रमाणात परिपक्व झाल्याने फळांचा राजा असलेला हापूस आंबा यंदा लवकर निरोप घेणार आहे. अतिउष्णतेमुळे हंगामाच्या मध्यावधीतील हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी, गुढीपाडवा व अक्षय तृतीया या काळात आंब्याचे दर दरवर्षीपेक्षा कमी राहिले. सद्य:स्थितीत हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दरवर्षी साधारण 15 जूनपर्यंत सुरू राहणारा हंगाम यंदा 31 मेपर्यंतच सुरू राहील, अशी शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागात सुरुवातीला कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून आवक होत होती. आता रत्नागिरी जिल्ह्यातून होत आहे. तुरळक सिंधुदुर्गमधून होत आहे. गेल्या आठवड्यात दीड ते दोन हजार पेटी होणारी आवक होत होती. आता ती एक हजार ते बाराशे पेटींवर आली आहे. ही आवक आणखी घटत जाणार आहेत. आवक घटली असली, तरीही भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. घाऊक बाजारात तयार आंब्याच्या 4 ते 7 डझनाच्या पेटीला 1500 ते 2500 रुपये इतका भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 300 ते 600 रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू आहे.

दरवर्षीच्या तुलनेत लवकर आंब्याची आवक सुरू झाली. अतिउष्णतेमुळे हंगामाच्या सुरुवातीसह मध्यावधी व अखेरच्या टप्प्यातही मोठी आवक राहिली. दरवर्षी 15 जूनपर्यंत रत्नागिरीचे तुरळक आवक सुरू असते. ती पुढील काही दिवसच असणार असल्याचे चित्र दिसत आहे.

– अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

कमी भावामुळे पल्पसाठी आंबा पाठविण्यास सुरुवात

पूर्व मोसमी पावसामुळे आंब्याला मागणी घटली आहे. परिणामी, शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळत नाही. माल पाठविण्यासाठी वाहतूक खर्च येतो. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांनी पुणे, मुंबईसह इतर भागांत आंबे पाठविणे कमी केले आहे. तर पल्पसाठी आंब्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांना माल विकण्यास पसंती देत आहेत.

कर्नाटक आंब्याची आवक दहा जूनपर्यंत सुरू राहणार

कोकणातील आवक घटली असली तरीही कर्नाटकमधून हापूस बाजारात दाखल होत आहे. रविवारी (दि.19) 7 ते 8 हजार पेटी आवक झाली. 4 ते 5 डझनाच्या पेटीला 800 ते 1300 रुपये भाव मिळत आहे. सध्या कोकणातील हापूसपेक्षा कर्नाटक हापूस खरेदी करण्यास नागरिक पसंती देत आहेत. 10 जूनपर्यंत कर्नाटक हापूसची आवक सुरू राहणार असल्याची माहिती कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT