पुणे

पुणे : पौडमध्ये चिमुकल्याचा बळी ; विजेच्या लोंबलेल्या तारांनी केला घात

अमृता चौगुले

पौड (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  पौड (ता. मुळशी) येथे लोंबलेल्या तारांमधील विजेचा धक्का बसून चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडली आहे. पौड गावात अनेक ठिकाणी लोंबलेल्या तारांचा धोका निर्माण झाला असून, महावितरणच्या अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना सांगूनही या तारा ओढल्या जात नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेनुसार, श्रेयश ऊर्फ साई चेतन राऊत (वय 13) हा दिगंबरनाथ आळी पौड कोळवण रस्त्याच्या कडेला क्रिकेट खेळत असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून चेंडू काढायला पत्र्यावर चढला. त्या वेळी पत्र्यावर लोंबलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेचा झटका श्रेयशला बसला.

यात श्रेयश पत्र्यावरून खाली फेकला गेला. यामध्ये श्रेयश काही ठिकाणी भाजला गेला होता, तर त्याच्या हातालाही मोठी दुखापत झाली होती. पुण्यातील खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, श्रेयशचा जीव वाचविण्यात यश आले नाही. श्रेयशच्या अत्यंविधीला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

महावितरण अधिकारी कर्मचार्‍यावर गुन्हा नोंदवा
पौड गावात लोंबत असलेल्या तारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून, महावितरणला अनेकवेळा विनंती करूनही या तारा वर ओढल्या जात नसून अजून किती बळी जाण्याची वाट महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पाहत असल्याचा प्रश्न पौड ग्रामस्थांना पडला आहे. या लोंबणार्‍या तारा जिवाला धोका बनू शकतात, हे माहीत असूनही त्या तशाच धोकादायक स्थितीत ठेवून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नोंदविण्याची मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT