जलपर्णी फोफवल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पुणे महापालिकेचा उदासीन कारभार  Pudhari
पुणे

Pune: जलपर्णी फोफवल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पुणे महापालिकेचा उदासीन कारभार

आंदोलन करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मांजरीतील मुळा नदीत पात्रात जलपर्णी साठल्याने नागिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही जलपर्णी खराडीतून पुढे ढकलण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च केले होते. ही जलपर्णी नदीपात्रात अडकली असून ती काढण्यासाठी आता पुन्हा पालिकेला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. या जलपर्णीमुळे मांजरी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

खराडीत नदीपात्रातील जलपर्णी वाढल्यामुळे नागरिक त्रासले होते. नदीपात्रात जलपर्णी साठल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही जलपर्णी मांजरी गावातील मुळा- मुठा नदीच्या पात्रात अडकली असून महापालिकेने तत्काळ जलपर्णी काढण्याची मागणी मांजरी ग्रामस्थांनी केली आहे. (Latest Pune News)

ही जलपर्णी काढण्यासाठी मांजरीतील नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. यावेळी ही जलपर्णी काढण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. मात्र, या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. खराडीत नदीवर पुलाचा बांधकाम व जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍यामुळे ही जलपर्णी येथे येऊन अडकली होती.

सुमारे तीन किलोमीटरच्या नदीपात्रात ही जलपर्णी साठली होती. खराडीतील नागरिकांनी ती काढण्याची मागणी केल्यावर मुंढवा- केशवनगर, खराडी भागातून ती पुढे ढकलण्यात आली. ही जलपर्णी काढणे गरजेचे होते. मात्र, ती न काढता पुढे ढकलल्याने याचा त्रास आता मांजरीकरांना होतोय. मांजरी गाव पालिकेत आले असून आता नदीपात्रात साचलेली जलपर्णी काढण्यासाठी आता पुन्हा पालिकेला आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

डासांचा त्रास

मांजरीत मुळा- मुठा नदीपात्रात जलपर्णी पसरली आहे. परिणामी, डासांची पैदास वाढली आहे. पर्यायाने गावठाण, मांजराईनगर परिसरामधील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, सटवाई नगर, 116 घरकुल, 72 घरकुल या झोपडपट्टी भागांमधील नागरिक डासांमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकिनारी असणार्‍या या झोपडपट्टी भागामध्ये तातडीने औषध फवारणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मांजरीमध्ये दरवर्षी नदीपात्रात जलपर्णी साठते. यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना त्रास होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जलपर्णी काढण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. जलपर्णी तत्काळ काढली जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले होते. आता पुन्हा जलपर्णी साठली आहे. त्यामुळे ती तत्काळ काढण्यात यावी, आम्हाला आंदोलन करण्याची वेळ परत आणू नये.
- राजेंद्र गोविंद साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती मांजरी
कल्याणीनगर भागातील नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली आहे, ती पुढे ढकलली जात आहे. हीच जलपर्णी पुढे जाऊन साठली आहे. मांजरी गावातील जलपर्णी काढून घेतली जाईल. त्यामुळे मांजरी ग्रामस्थांनी काळजी करू नये.
- मंगेश दिघे, पर्यावरण संवर्धन अधिकारी, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT