पुणे : सैन्यदल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातील मोठा क्षण शुक्रवारी अनुभवायला मिळाला. एनडीएतील १४८व्या तुकडीचे ऐतिहासिक दीक्षांत संचलन शुक्रवारी झाले. महिला कडेटची पहिली तुकडी एनडीएतून बाहेर पडली. पहिल्या तुकडीतील १७ मुलींनी दीक्षांत संचलनानंतर पुशअप्स मारून आनंद साजरा केला. (Pune News Update)
मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांची दीक्षांत संचलनाला प्रमुख उपस्थिती होती. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ ,एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी या वेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या अंतरिम निकालानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवून १९ मुलीची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १७ कडेट्स नी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर आता या सर्व आधिकारी मुली पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल होणार आहेत.
या परेड मध्ये मुले आणि मुली यांनी एकत्र पथ संचलन केले. त्यामुळे मुलगा आणि मुलगी कॅडेट ओळखणे अवघड झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी मुलींशी संवाद साधण्याची वारंवार विनंती केल्यावर एनडीएचे संचालक ऍडमीरल गुरुचरण सिह यांनी अखेर ती परवानगी दिली आणि मग लाजत लाजत मुली खुलल्या. त्या म्हणाल्या, 'एनडीए मध्ये आमची तुकडी येण्याआधी पुरुष प्रधान संस्कृती इथे होती. पण आम्ही येताच ती स्त्री आणि पुरुषांना समान झाली हा मोठा बदल एनडीए मध्ये आम्ही पाहिला..