पुणे

ब्रास बॅंड पथकांची आर्थिक स्थिति सावरेना ! पुण्यातील जवळपास 50 पथके कायमस्वरूपी बंद

अमृता चौगुले

पुणे : डीजेचा दणदणाट अन् ढोल-ताशा पथकांची वाढलेली संख्या…. अशा विविध कारणांमुळे पुण्यातील ब्रास बँड पथकांना वादनाचे कार्यक्रम मिळणे कठीण झाले आहे. त्यात कोरोना काळात बसलेल्या आर्थिक फटक्यातून पथके अजूनही सावरलेली नाहीत. त्यामुळेच पुण्यातील जवळपास 50 पथके कायमस्वरूपी बंद पडली असून, सध्या सुरू असलेली पथकेही आर्थिक नुकसानीत आहेत.

आताचा पावसाळ्याचा सीझन, लग्नसराईचे मुहूर्त नसल्यामुळे सध्यातरी पथकांकडे काम नसल्याची स्थिती आहे. याशिवाय गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या सीझनमधील आगाऊ बुकिंगही सुरू न झाल्याने आता आम्ही करायचे काय? हा प्रश्न पथक मालकांना पडला आहे. पुण्यात अनेक ब्रास बँड पथके आहेत. वर्षभर हा व्यवसाय सुरू असतो. एका पथकात दहा ते बारा वादकांचा सहभाग असतो आणि त्यांचे वादन हे सण-उत्सवात, कार्यक्रमांमध्ये, लग्नात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात ठरलेले असते; परंतु कोरोनानंतर पथकांना काम मिळणे कठीण झाले आणि आताही हीच परिस्थिती आहे.

त्यामुळे पथकांच्या मालकांना महिन्याचा व्यवस्थापनाचा खर्च करणेही कठीण जात आहे. कार्यालयाचे भाडे, कलाकारांचे मानधन, वीजबिल, साहित्य व्यवस्थापनाचा खर्च, वाहतुकीचा खर्च भागविण्यात त्यांना अवघड जात आहे. दरबार ब्रास बँडचे इक्बाल दरबार म्हणाले, कोरोनामुळे पथकांना काम मिळणे कठीण झाले होते, ती स्थिती आताही 'जैसे थे'च आहे. मोजकीच कामे पथकांना करावी लागत असून, हा व्यवसाय आर्थिक नुकसानीत आहे. त्यात पावसाळ्याचे चारही महिने पथकांकडे काम नाही. कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटक्यातून पथके सावरलेली नाहीत. त्यामुळे काम मिळाले तरी पैसे कमी घेऊन, तडजोड करत पथके काम करत आहेत. पुण्यात डीजेची आणि ढोल-ताशा पथकांची संख्या वाढल्यानेही त्याचा परिणाम पथकांच्या कामावर झाला आहे, असे प्रभात ब्रास बँडचे अमोद सोलापूरकर यांनी सांगितले.

डीजेला प्राधान्य दिले जात असल्याने पथकांचे वादनाला फारसे महत्त्व दिले जात नसल्याची स्थिती आहे. नोव्हेंबर ते मार्च हा आमचा कामाचा सीझन असतो. गेल्या वर्षी तर सीझनमध्ये पथकांकडे कामच नव्हते. आताही परिस्थिती सुधारलेली नाही. कलाकारांना मानधन देता येईल एवढेही पैसे कार्यक्रमांसाठी काही वेळा मिळत नाहीत. आता निम्म्या रकमेत काम करावे लागते. पुण्यात जवळपास 50 पथके कायमस्वरूपी बंद पडली आहेत. तर जी पथके चालू आहेत तीही आर्थिक फटका सहन करत आहेत.
                       – बाळासाहेब आढाव, अध्यक्ष, पुणे बँड कला विकास प्रतिष्ठान 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT