खोर: खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाल लवकरच संपुष्टात येत असून, आगामी पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. खोर ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी घोषित झाले आहे.
कुणबी जातप्रमाणपत्राच्या आधारे मोठी अटीतटीची लढत या वेळी पाहवयास मिळणार आहे. अनेक इच्छुकांनी कुणबी जातप्रमाणपत्र काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, या वर्षीची सरपंचपदाची लढाई रंगतदार होणार आहे. (Latest Pune News)
आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गट खोर गावात सक्रिय आहेत. दोन्ही गटांकडून सरपंचपदाचा उमेदवार कोण राहील, याबाबतची पडताळणी सुरू झाली आहे. एकंदरीतच दोन्ही गटांकडून सरपंचपद आपल्याकडे येण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सन 2011 ते 2015 पर्यंत खोर ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल गटाचा झेंडा होता.
यादरम्यान खोरचे तत्कालीन सरपंच ज्ञानेश्वर चौधरी यांनी सन 2012 ते 2013 मध्ये एक वर्षाच्या कालावधीत पाण्याच्या मुद्द्यावर आवाज उठविला. वेळप्रसंगी दौंड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबिला. वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावामधून खोर गावाला ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावाला पाण्याची योजना राबविण्यात आली.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज अद्ययावत इमारत उभी राहिली. अद्ययावत खोर ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी केली. तसेच, याच दरम्यान शिरपूर पॅटर्न खोर गावात राबवून ओढा खोलीकरण करून खोरला जलसंधारणाचा नवा पॅटर्न उदयास आला. ज्ञानेश्वर चौधरी यांनी अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल 9 कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा केला.
सन 2015 मध्ये खोर ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता प्रस्थापित झाली. या वेळी तत्कालीन सरपंच रामचंद्र चौधरी यांनी सरपंचपदाच्या कालावधीत देखील अनेक विकासकामांचा डोंगर रचत गावच्या विकासाला हातभार लावला.
खोर परिसराला पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर सन 2017 मध्ये सदस्य फुटीनंतर पुन्हा आमदार राहुल कुल गटाची सत्ता आली. या वेळी सरपंच सुभाष चौधरी यांनी चार वर्षे गावाचा कारभार सांभाळला. सन 2021 ते 2025 दरम्यान पुन्हा खोर ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
दरम्यान, आगामी पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्या गटाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. माजी आमदार रमेश थोरात गटाकडून सध्या उमेदवारीच्या संदर्भात चाचपणी सुरू असल्याचे माजी सरपंच रामचंद्र चौधरी यांनी सांगितले.
रिंगणात उतरण्यासाठी ठोस चेहरा अजून तरी समोर आलेला नाही. मात्र, आमदार राहुल कुल गटामधून खोर गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी यांनी सरपंचपदासाठी उमेदवारीच्या रिंगणात उतरावे, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून पुढे येऊ लागली आहे. सरपंचपदाची लढाई ही मात्र कुल-थोरात यांच्यात जोरदार होणार, हे तितकेच खरे.
सरपंच विकासकामांना प्राधान्य देणारा असावा
खोर परिसरात सुरू चाललेले औद्योगिकीकरण, गावाच्या उशाशी सुरू असलेले छ्त्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे खोर गावाची पुढील वाटचाल प्रगतीच्या दिशेने असणार आहे. त्यामुळे खोर गावाचा सरपंच हा विकासकामांना प्रथम प्राधान्य देणारा असावा, असे मत या परिसरातील ग्रामस्थांचे आहे.