पुणे

तालुक्यातील कारखानदारी गेली दुसरीकडे..! मुळशीकरांचे एमआयडीसीचे स्वप्न भंगले

Laxman Dhenge

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यामध्ये पिरंगुट आणि परिसरामध्ये असलेल्या कारखानदारांना ग्रामपंचायतीकडून, तसेच शासनाकडून मूलभूत सुविधा देता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक कारखानदारांनी मुळशी तालुक्याला रामराम ठोकला. परिणामी, चांगल्या एमआयडीसीचे मुळशीकरांचे स्वप्न भंग पावले. मुळशी तालुक्यामध्ये साधारणतः 1985 ते 86 च्या काळामध्ये पहिल्यांदा कारखाने सुरू झाले. त्यानंतर ते वाढतच राहिले. सर्वप्रथम लवळे फाट्याजवळील पिरंगुट घाटाच्या पायथ्याला कारखाने सुरू झाले. त्यानंतर हळूहळू घोटवडे फाटा चौक, उरवडे रोड, भरे, शिंदेवाडी अशा चार ते पाच गावांच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे छोटे-मोठे औद्योगिक कारखाने सुरू झाले. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कारखानेदेखील होते.

मात्र, तालुक्यातील असुविधेमुळे अनेक कारखानदारांनी आपले बस्तान चाकण, रांजणगाव यासारख्या मोठमोठ्या एमआयडीसीकडे वळवले. आमच्या अडीअडचणी कोणीही ऐकूनच घेत नाही आणि ऐकून घेतल्या तर त्याच्यावर कोणी मार्ग काढत नाही, मग आम्ही आमचे नुकसान का करायचे? त्यापेक्षा आम्ही हा तालुका सोडून दुसरीकडे जातो, असे असे सांगून अनेक कारखाने इथून निघून गेले आहेत. त्यामध्ये टाटा ग्रुपच्या एका मोठ्या कारखान्याचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी उरवडे रोडला एका केमिकलच्या कंपनीत आग लागून अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी त्या कारखान्याजवळ आग नियंत्रणात आणण्यास अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली होती. कारण रस्ते खराब आणि छोटे होते. हीच अवस्था पिरंगुट आणि परिसरातील सर्व औद्योगिक कारखान्यांबाबत आजही आहे.

कारखान्यांकडून ग्रामपंचायती टॅक्स वसूल करते, परंतु त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे अनेक कारखानदारांनी तक्रार केलेली आहे. परिसरामध्ये दोन हजारांपेक्षा जास्त छोटे-मोठे औद्योगिक कारखाने आहेत. 10 ते 15 हजार कामगार या ठिकाणी काम करतात. परंतु त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने हळूहळू यापैकी अनेक कारखाने आता तालुका सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तालुक्यामध्ये महावितरणचे एकच उपकेंद्र असल्यामुळे कारखानदारांना त्यांचे मशीन किंवा कारखाने चालविण्यासाठी जेवढी गरज आहे तेवढी वीज मिळत नाही. एकदा वीज गेली की ती कधी परत येईल याची शाश्वती नाही. मग मोठे आर्थिक नुकसान कारखानदारांना सहन करावे लागते. आर्थिक नुकसान सहन करून कारखाना चालविणे शक्य नसल्यामुळे ज्या ठिकाणी आम्हाला पुरेशी वीज, रस्ता आणि पाणी या मूलभूत सुविधा मिळतात अशा ठिकाणी आम्ही आमचे कारखाने घेऊन जातो, असे कारखानदारांचे मत आहे.

एकाच मतदारसंघात दुजाभाव का?

बारामती एमआयडीसीमध्ये कारखानदारांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात. त्यावर मात केली जाते आणि नवनवीन प्रकल्प आणले जातात, मग मुळशी तालुक्यातच असे का ? एकाच लोकसभा मतदारसंघांमध्ये असा दुजाभाव का केला जातो आणि आमच्या या अडचणी का सोडविल्या जात नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य मुळशीकर नागरिकांना पडला आहे.

कारखानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या

  • 24 तास वीज उपलब्ध व्हावी.
  • अंतर्गत रस्ते सिमेंटचे करावेत.
  • वेगळे अग्निशामक केंद्र पाहिजे.
  • पाण्याची मुबलक उपलब्धता असणे गरजेचे आहे.
  • ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजलाइन सोय पाहिजे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT