पुणे

पिंपरी : वाहून आलेल्या जलपर्णीने नदीपात्र व्यापले

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पवना, इंद्रायणी व मुळा नदीतील जलपर्णी काढून नदीपात्र स्वच्छ केले. मात्र, या तीन नद्यांचे पात्र जलपर्णीने संपूर्णपणे व्यापले आहे. त्यामुळे पालिकेने खर्च केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्याची शंका शहरवासीयांकडून उपस्थित केली जात आहे. शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा अशा तीन नद्या वाहतात. पवना नदीची लांबी 24.40 किलोमीटर, इंद्रायणी नदीची लांबी 18.80 किलोमीटर तर, मुळा नदीची लांबी 14.20 किलोमीटर आहे. पावसाळा सोडून आठ महिने या तीनही नद्यांतून जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत.

नद्याचे सहा भाग करून हे काम विविध ठेकेदारांकडून 31 मे रोजीपर्यंत करून घेण्यात आले. त्यासाठी तब्बल 8 कोटी रूपये खर्च पालिकेने केला आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात तीनही नदी पात्रात पुन्हा जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आठ महिन्यांत जलपर्णी काढली गेली नाही का, असा प्रश्न त्रस्त रहिवाशांकडून विचारला जात आहे. केवळ ठेकेदार पोसण्यासाठीच जलपर्णी काढण्याचे काम केले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

आरोग्याकडून पर्यावरण विभागाकडे जबाबदारी
शहरातील तीनही नद्यांतून जलपर्णी काढण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ठेकेदार नेमले जात होते. मात्र, यंदापासून जलपर्णी काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. थेरगाव, बोट क्लब येथे नदी पात्रातील मासे मरण पावल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यास सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पावसामुळे वरील बाजूने जलपर्णी वाहून आली
नदीपात्रातील जलपर्णी काढून पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. तसे, गुगल छायाचित्रे आमच्याकडे आहेत. मात्र, नदीच्या वरील बाजूने ही जलपर्णी शहरात आली आहे. सध्या नदीचे पाणी वाहते असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. जलपर्णी काढून पात्र स्वच्छ करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT