पुणे : लग्नानंतर शरीरसंबंध न ठेवणे ही एक प्रकारची क्रूरता असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने पतीपासून पत्नीची सुटका करत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. वैद्यकीय तपासणीनंतर दोष असल्याने पती शरीरसंबंध ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हणणे पत्नीने दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देत घटस्फोटानंतर तिला दरमहा सात हजार रुपये पोटगी देण्यात यावी, असेही निकालात नमूद केले आहे.
विजय (37) आणि विजया (27) अशी दोघांची नावे आहेत. विजय शिक्षक तर विजया गृहिणी. दोघांचा मे 2014 मध्ये परंपरेनुसार पाहणी करून विवाह झाला. विजयने पहिल्या रात्रीनंतर संबंध ठेवण्यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. याउलट विजयाला न सांगता तो भजन आणि कीर्तन करायला जात असे. संसारात रस नसून संन्यास घेणार असल्याचे तो सांगायचा. नोकरीवर न गेल्याने तो निलंबित झाला होता. त्या काळात सहा महिने तिला माहेरी ठेवले. कामावर रुजू झाल्यानंतर तो तिला घेऊन गेला. मात्र, वागणे पूर्वीप्रमाणेच होते. तिच्यातच दोष असल्याने मूलबाळ होत नसल्याचे तो सांगायचा. मात्र घरच्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पडल्याने तो शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरीही तिला संसार करायचा होता. तिने उपचार करण्याचा सल्ला त्याला दिला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने अॅड. विकास मुसळे यांचेमार्फत न्यायालयात दावा दाखल केला. तेथे तो वकिलामार्फत हजर राहिला. मात्र कैफियत मांडली नाही.